बर्मिंगहॅम राष्ट्रकूलमध्ये पदकांचे शतक होणार का? | पुढारी

बर्मिंगहॅम राष्ट्रकूलमध्ये पदकांचे शतक होणार का?

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा दि. 28 ऑगस्टपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात होत आहे. इंग्रजांनी जगातील ज्या देशांवर राज्य केले, ते देश या स्पर्धेत सहभागी होत असतात. 2010 साली भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी भारताने पदकांचे शतक गाठले होते; परंतु त्यानंतर मात्र भारताला अशी कामगिरी करता आलेली नाही. 2014 साली ग्लास्गो स्पर्धेत 64 पदके भारताच्या वाट्याला आली. यामध्ये 15 सुवर्णपदके, 30 रौप्य आणि 19 कांस्यपदक यांचा समावेश होता.

2018 च्या गोल्डकोस्ट स्पर्धेत भारताने 66 पदकांसह तिसरे स्थान मिळवले. यात 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्यपदके होती. बर्मिंगहॅम राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन 215 खेळाडू सहभागी होत आहेत. भारतासाठी या स्पर्धेची एक वाईट बाजू म्हणजे देशाला सर्वाधिक पदके मिळवून देणारा नेमबाजीचा खेळ या स्पर्धेतून हटवण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय पदक संख्येला याचा फटका बसेल. या स्पर्धेत भारताला कोणत्या खेळातून पदके मिळेल याची माहिती घेऊ.

अ‍ॅथलेटिक्स : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोपडा सुवर्णपदक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचे 37 खेळाडू भाग घेणार आहेत. यात नीरजसह दुती चंद, हिमा दास, तेजस्विन शंकर यांचा समावेश आहे. गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग जखमी झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

बॅडमिंटन : या खेळात भारताला कमीत कमी चार सुवर्णपदके जिंकण्याची संधी आहे. पी. व्ही. सिंधू हिच्यासह लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे सर्व सुवर्णपदकाचे दावेदार आहेत.

बॉक्सिंग : नुकताच वर्ल्ड चॅम्मियनशिपचा किताब मिळवलेली निकत झरीन ही 50 किलो गटात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकू शकते. यासह अमित फांगल, लवलीना बोरगोहेन, संजीतकुमार, शिव थापा, मोहम्मद हुसामुद्दीन यांच्याकडूनही सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे.

टेबल टेनिस : गेल्या स्पर्धेत पुरुष संघ, महिला संघ आणि महिला एकेरीत मनिका बात्रा यांनी सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला होता. यावर्षी या तिन्हीशिवाय पुरुष एकेरीत जी गणशेखरन किंवा शरथ कमल यांच्याकडूनही सुवर्णपदक मिळू शकते.

वेटलिफ्टिंग : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सैखोम मीराबाई चानू हिच्या नेतृत्वाखालील वेटलिफ्टिंग संघही सोने मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. विद्याराणी देवी आणि गुरुराजा पुजारी ही काही आश्चर्यकारक नावे पदकांच्या शर्यतीत दिसतील.

कुस्ती : टोकिओ ऑलिम्पिकपदक विजेता रविकुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांच्याकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. दीपक पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि दिव्या काकरान हे सुद्धा भारताच्या पदक तालिकेत सुवर्णाची भर घालण्याचे दावेदार आहेत.

Back to top button