India vs West Indies 1st ODI : श्वास रोखून धरणारा थरार! रोमहर्षक सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ३ धावांनी विजय

India vs West Indies 1st ODI : श्वास रोखून धरणारा थरार! रोमहर्षक सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ३ धावांनी विजय

पोर्ट ऑफ स्पेन : वृत्तसंस्था : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs West Indies 1st ODI) वेस्ट इंडिजवर 3 धावांनी विजय मिळवला. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा करून विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजला ते गाठता आले नाही. अखेरच्या षटकात श्वास रोखणारा थरार पहायला मिळाला आणि या रोमहर्षक सामन्यात भारताने विजय मिळवला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने थ्रिलर जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.

कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळवलेल्या शिखर धवन याचे हुकलेले शतक आणि त्याच्यासोबत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतके याच्या जोरावर (India vs West Indies 1st ODI) भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या.

धवन, गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यांची फलंदाजी पाहून टीम इंडिया आज 400 पार धावा सहज उभारेल, असेच चित्र दिसत होते. पण, वेस्ट इंडिजने चांगले कमबॅक केले. निकोलस पूरनने सुरेख रन आऊट करून गिलला बाद केले आणि त्यानंतर अय्यरचा अफलातून कॅच घेत सामना फिरवला. धवनही शतकापासून 3 धावांनी वंचित राहिला. विंडीजच्या गोलंदाजांनी अखेरच्या 17 षटकांत चांगली गोलंदाजी केली.

पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या शुभमन गिल व शिखर धवन यांनी 119 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 18 व्या षटकात संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचूक थ्रोने गिलला धावबाद केले आणि त्याला 64 धावांवर माघारी जावे लागले. धवन व श्रेयस यांनी आक्रमक खेळ केला. धवनला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. गुदाकेश मोतीएने विंडीजला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या फिरकीवर कट मारण्याचा प्रयत्न धवनने केला अन् बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या शामर्ह ब्रूक्सने अफलातून कॅच घेतला. धवन 99 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकारांसह 97 धावांवर माघारी परतला. (IND vs WI)

गुदाकेश मोतीएनेच श्रेयसची विकेट मिळवून दिली. कव्हरवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत झेपावत एका हाताने चेंडू टिपला. श्रेयस 57 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव (13), संजू सॅमसन (12) झटपट माघारी परतले आणि भारताच्या धावगतीचा वेग संथ होत गेला. 1 बाद 213 वरून पुढील 39 धावांत भारताने 4 फलंदाज गमावले. रोमारिओ शेफर्डने भारताला पाचवा धक्‍का दिला. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करून संघाला 300 च्या पार नेले. अल्झारी जोसेफने 49 व्या षटकात अक्षर (21) व दीपक (27) या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला 7 बाद 308 धावा करता आल्या. 35 षटकांत 2 बाद 225 अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील 15 षटकांत 83 धावांत 5 फलंदाज गमावले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करू शकला. ज्यामुळे भारत 3 धावांनी विजयी झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news