संयुक्‍त अरब अमिरातमध्ये आशिया चषक खेळवणे निश्‍चित : सौरव गांगुली | पुढारी

संयुक्‍त अरब अमिरातमध्ये आशिया चषक खेळवणे निश्‍चित : सौरव गांगुली

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे श्रीलंकेमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे आम्ही आशिया चषक खेळवू शकत नाही, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने बुधवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी श्रीलंकेतील आशिया चषक आता संयुक्‍त अरब अमिरातमध्ये खेळवला जाणार आहे, याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्‍त केले आहे.

सौरव गांगुली यांनी गुरुवारी सांगितले की, आशिया चषक संयुक्‍त अरब अमिरातमध्ये होणार आहे, जो आधी श्रीलंकेत खेळवण्यात येणार होता. आशिया चषक संयुक्‍त अरब अमिरात (यूएई) येथे होणार आहे कारण हे एकमेव ठिकाण आहे जेथे पाऊस पडत नाही. त्यामुळे तिथे ही स्पर्धा खेळवणे सध्याच्या घडीला सोयीस्कर असेल. श्रीलंकेमध्ये आता राजकीय अस्थिरता आहे, त्याचबरोबर देशामध्ये आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही सध्याच्या घडीला तर असमर्थ आहोत, असे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा लंकेत होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

श्रीलंका क्रिकेटने आशियाई क्रिकेट परिषदेला कळवले होते की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया चषक टी-20 स्पर्धेचे आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या संकटामुळे श्रीलंका क्रिकेटने अलीकडेच लंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पा पुढे ढकलला होता. ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला होता. आशिया चषक स्पर्धा ही 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे.

Back to top button