आशियाई शरीरसौष्ठवात भारतच ‘बाहुबली’ | पुढारी

आशियाई शरीरसौष्ठवात भारतच ‘बाहुबली’

माफुशी (मालदीव) : वृत्तसंस्था 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेवर भारतानेच वर्चस्व गाजवले. भारताच्या यतिंदर सिंगने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात चार वर्षांनी कमबॅक करताना आपल्याच देशातील अनुज कुमार तालियान, आर. कार्तिकेश्‍वर, एम. सर्वानन यांच्यासारख्या दिग्गजांवर मात करून आशिया श्रीचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. यतिंदरबरोबर भारतानेही आज सात पैकी सहा सुवर्ण जिंकून आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवात भारतच ‘बाहुबली’ असल्याचे जगाला दाखवून दिले. भारताने शरीरसौष्ठव इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना 13 सुवर्ण पदकांसह विक्रमी 38 पदके जिंकली. यात 16 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे.

दिवसाचे पहिले सुवर्ण 70 किलो वजनी गटात हरीबाबूने पटकावले. 75 किलोमध्ये इराणी विजेता ठरला. 80 किलोत अश्‍विन शेट्टी सर्वात्तम ठरला तर 85 किलोमध्ये यतिंदरने थायलंडच्या अपिचाय वांडीवर मात केली. 90 किलोमध्ये एम. सर्वानन आपल्याच संजोय साहाला मागे टाकून विजेता ठरला. 100 किलोच्या गटात कार्तिकेश्‍वरने उझबेकिस्तानच्या आंद्रेय फेडोरोव्हचे आव्हान मोडीत काढले तर 100 किलोवरील गटात चारही खेळाडू भारतीय असल्यामुळे यात अनुज कुमार तालियान विजेता ठरला.

अशाप्रकारे सलग पाच गटांत जन गण मनचे सूर ऐकायला मिळाल्यानंतर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत भारताचाच खेळाडू बाजी मारणार हे स्पष्ट होते. यात यतिंदरने अनुज आणि कार्तिकेश्‍वरचे कडवे आव्हान परतावून लावत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

हेही वाचा

Back to top button