भारताची अन्नू राणी भालाफेकीच्या अंतिम फेरीत | पुढारी

भारताची अन्नू राणी भालाफेकीच्या अंतिम फेरीत

वॉशिंग्टन : भारताची महिला भालाफेकपटू अन्नू राणी सलग दुसर्‍यांदा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. अन्नूने शेवटच्या प्रयत्नात 59.60 मीटर भालाफेक करत अंतिम फेरी गाठली. अन्नूने आपल्या पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. तर दुसर्‍या प्रयत्नात 55.35 मीटर भाला फेकला. त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, तिसर्‍या प्रयत्नात तिने 59.60 मीटर भाला फेकून तिने आपले आव्हान जिवंत ठेवले. तिसर्‍या प्रयत्नात तिचा भाला 60 मीटर मार्कच्या फक्त 40 सेंटिमीटर मागे राहिला. ती पात्रता फेरीत ग्रुप ‘बी’मध्ये पाचव्या स्थानावर राहिली. पात्रता फेरीतील दोन गटांतून सर्वोत्तम आठ भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यात अन्नूने स्थान पटकावले.

29 वर्षाच्या अन्नू राणीच्या नावावर भालाफेकीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. मात्र, तिला वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 60 मीटरचा मार्क गाठण्यात अपयश आले आहे. आता राणीला शनिवारी सकाळी होणार्‍या अंतिम फेरीत आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे. तिची 63.82 मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. जे भालाफेकपटू 62.50 मीटरचा मार्क पार केला आहे ते थेट फायनलसाठी पात्र झाले. असे तीनच खेळाडू थेट पात्र झाले आहेत.

अन्नू राणीची ही तिसरी वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे. ती 2019 दोहा येथे झालेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 61.12 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत आठव्या स्थानावर राहिली होती. ती 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र झाली नव्हती. अन्नूच्या नावावर 63.82 मीटर भालाफेकीचा राष्ट्रीय विक्रम आहे. मे महिन्यात जमशेदपूर येथे झालेल्या इंडियन ओपन भालाफेक स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय विक्रम केला होता.

Back to top button