मालदीवमध्ये ‘जन गण मन’चे सूर | पुढारी

मालदीवमध्ये ‘जन गण मन’चे सूर

माफुशी (मालदीव) : वृत्तसंस्था : मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांची जबरदस्त कमाई केल्यामुळे मालदीवमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने ‘जन गण मन’चे सूर घुमले. नवी मुंबईच्या पोलिस दलात सहायक पोलिस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीर सौष्ठवाच्या गटात ‘आशिया श्री’चा बहुमान पटकावून इतिहास रचला. तसेच दिव्यांगांच्या गटात के. सुरेश, ज्युनियर गटात (75 किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश संपादले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माफुशी बेटावर वादळी वार्‍याचे आगमन झाल्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, मालदीव शरीर सौष्ठव संघटनेने तासाभरात नव्या आयोजन स्थळाची व्यवस्था केली. ज्यात अकरा गटांच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. वादळी वार्‍यासह सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनीही वादळी कामगिरीचा धडाका दिला. दिव्यांगांच्या पहिल्याच गटात रौप्य आणि कांस्यपदकही भारतीयांनी जिंकले. के. सुरेशने सुवर्ण विजेती कामगिरी करत भारताचे सुवर्ण पदकाचे खाते उघडले.

नवी मुंबईच्या पोलिस दलात सहायक पोलिस इन्स्पेक्टर म्हणून सेवेत असलेल्या सुभाष पुजारी (मूळ गाव रेंदाळ, जि. कोल्हापूर) यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचे पदक खोवले, पण यावेळी पदकाचा रंग सोनेरी होता. मास्टर्स ‘आशियाई श्री’ च्या 80 किलो वजनी गटात मलेशिया आणि व्हिएतनामच्या तगड्या खेळाडूंवर मात करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

52 गट आणि 382 खेळाडू

मालदीव सरकार आणि मालदीव शरीर सौष्ठव संघटनेने अत्यंत शिस्तबद्ध आणि अप्रतिमरीत्या आयोजन केलेल्या या स्पर्धेत एकंदर 52 गटांमध्ये चुरस होत असून आशियातील 24 देशांतील विक्रमी 382 खेळाडूंना आपला सहभाग नोंदविला. या देखण्या स्पर्धेचे उद्घाटन मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालीह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस चेतन पाठारे हे उपस्थित होते.

Back to top button