‘कॅरम लव्हर्स’ विजेतेपदाचा मानकरी | पुढारी

‘कॅरम लव्हर्स’ विजेतेपदाचा मानकरी

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : इंडियन ऑईल, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, ओएनजीसी व क्रिस्टल पुरस्कृत रत्नागिरी कॅरम लीग सीझन 5 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅरम लव्हर्स संघाने बाजी मारली. सत्यशोधक स्ट्रायकर्स संघाला 2-1 असे पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

रत्नागिरीत झालेल्या या स्पर्धा आ. उदय सामंत यांनी पुरस्कृत केल्या होत्या. कॅरम लव्हर्स संघाच्या मोहम्मद अरिफने अहमद अली सय्यदवर चुरशीच्या लढतीत 20-22, 25-1, 25-6 असा विजय मिळविला. दुसर्‍या सामन्यात के. श्रीनिवासने योगेश परदेशीवर दोन सरळ सेटमध्ये 25-8, 25-4 अशा विजयाची नोंद केली. दुहेरी सामन्यात मात्र सत्यशोधक स्ट्रायकरच्या मोहम्मद घुफ्रान व एल. सूर्यप्रकाश जोडीने कॅरम लव्हर्सच्या अभिषेक चव्हाण व राहुल सोळंकीवर तीन सेटमध्ये 4-25, 24-19 व 25-20 अशी मात केली होती.

विजेत्या संघाला 1 लाख 75 हजार तर उपविजेत्या संघाला 1 लाख 50 हजारांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आला. तिसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या लायबा कॅरम मास्टर्सला 1 लाख 25 हजारांचे पारितोषिक व चषक देण्यात आला. मोहम्मद अरिफ या लीगमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूू ठरला. त्यालाही रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणार्‍या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली.

विजेत्यांना आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव व्ही. डी. नारायण, अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव भारती नारायण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा, उपाध्यक्ष अरुण केदार, शांताराम गोसावी, सचिव यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, उर्मिला घोसाळकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर आदी यावेळी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल बर्वे, मंदार दळवी, मोहन हजारे, विवेक देसाई, दिनेश पारकर यांनी विशेष योगदान दिले.

Back to top button