ICC ODI Rankings : भारताची वनडे रँकिंगमधील तिस-या स्थानावर मजबूत पकड | पुढारी

ICC ODI Rankings : भारताची वनडे रँकिंगमधील तिस-या स्थानावर मजबूत पकड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले असून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही आपले स्थान मजबूत केले आहे. आता तिसऱ्या क्रमांकावरील भारताची स्थिती मजबूत झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी भारताला मागे टाकणे कठीण असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले होते. सध्या भारताचे 109 रेटिंग गुण असून पाकिस्तानचे 106 आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 128 रेटिंग गुणांसह आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा संघ भारताकडून पराभूत होऊनही 121 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर 101 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. (team india consolidate third spot in icc odi rankings after series win against england)

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने रविवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत येत्या आठवड्यात बदल होऊ शकतो, कारण सहाव्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिका सध्या पाकिस्तानपेक्षा फक्त सात गुणांनी मागे आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास ते पाकिस्तानला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचू शकतात. तर दुसरीकडे भारताच्या वेस्ट इंडीज दौ-याला सुरुवात होत असून येथे रोहित शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारत आपली स्थिती आणखी मजबूत करू शकतो. पाकिस्तान सध्या श्रीलंकेसोबत कसोटी मालिका खेळत असून ऑगस्टमध्ये ते नेदरलँडमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. (team india consolidate third spot in icc odi rankings after series win against england)

मँचेस्टर येथे रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. ऋषभ पंतची शतकी खेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. पंतचे धडाकेबाज शतक आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तिस-या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी जिंकली.

Back to top button