

वृत्तसंस्था ; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा 2023 ते 2027 या कालावधीतील कसोटी मालिकांचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणारी कसोटी मालिका आता पाच सामन्यांची असणार आहे. 1992 नंतर प्रथमच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. फ्युचर टूर प्लॅनिंग (एफटीपी) अर्थात भविष्यकालीन दौरा नियोजनानुसार मे 2023 ते 2027 या कालावधीत भारतीय संघ एकूण 38 कसोटी सामने खेळणार आहे. त्यापैकी सर्वाधिक 10 कसोटी इंग्लंडविरुद्ध, तर 9 कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होतील.
2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ हा आशियातील पहिला संघ ठरला होता आणि दोन वर्षांनंतर निराशाजनक सुरुवातीनंतरही टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पुन्हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली.
आता भारतीय संघ 2024-25 ला ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे आणि त्यानंतर 2027 च्या सुरुवातीला भारतात परतीची मालिका होणार आहे. या दोन्ही मालिका जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 2023-25 व 2025-27 च्या सर्कलचा भाग असणार आहेत.