मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एजबॅस्टनवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत विरुदध लागलेला डीआरएस निर्णय भारतासाठी घातक ठरल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने म्हटले आहे. आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या राज्याचा प्रचार करण्यासाठी तसेच संबंधित राज्य देत असलेल्या विविध संधींचे प्रमोशन करण्यादृष्टीने सात दिवसांच्या भारत दौर्याच्या इंडिया ट्रेड मिशनचा भाग म्हणून आयोजित पत्रकार परिषदेत हॉग याने अनेक प्रश्नांवर मतप्रदर्शन मांडले. यावेळी डेप्युटी प्रीमियर आणि टुरिझम मंत्री रॉजर कुक तसेच टुरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापकीय संचालक कॅरोलिन टर्नबुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाचव्या कसोटीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ज्यो रूटविरुद्ध केलेले पायचीतचे अपील तिसर्या अंपायर्सनीही फेटाळले. वास्तविक पाहता रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे स्पष्ट दिसत होते. भारताने ही डीआरएस घेतली तेव्हा इंग्लंडची अवस्था 3 बाद 132 धावा अशी होती. त्यावेळी रूट 12 धावांवर खेळत होता. डीआरएसरूपी जीवदानाचा फायदा उठवत चौथ्या दिवसअखेर नाबाद अर्धशतक झळकावताना रूटने यजमानांचा डाव मजबूत स्थितीत आणला.
हॉग याने भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल तसेच फटकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. मुंबईकर सूर्यकुमारला त्याने, सर्व कोनामध्ये फटके खेळणारा अत्यंत खतरनाक फलंदाज असे संबोधले.