सिंगापूर, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदके जिंकणार्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपन सुपर 500 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. तिने चीनची कट्टर प्रतिस्पर्धी हान यू चा रोमांचक सामन्यात पराभव केला. सिंधू आणि हानचा सामना जवळपास एक तास चालला. सिंधूने सामना 17-21, 21-11, 21-19 असा जिंकला.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूला हानने पहिल्या गेममध्ये चांगलेच दमवले. हान सुरुवातीपासूनच पहिल्या गेमवर पकड मिळवली. मात्र, झुंजार सिंधूने दुसर्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने दुसरा गेम 21-11 असा सहज जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर तिसर्या आणि निर्णायक सेटमध्ये हानचा कडवा प्रतिकार मोडून काढत सिंधूने 21-19 अशी मात केली. हा सामना 62 मिनिटांपर्यंत चालला. सिंधू आता हान सोबतच्या हेड टू हेड लढतीत 3-0 अशी आघाडीवर आहे.
हान बरोबरच्या सामन्यात तिसर्या गेममध्ये सिंधू पहिल्यांदा 8-11 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर हानने आपली आघाडी 9-14 अशी केली. मात्र सिंधूने झुंजार वृत्ती दाखवत सलग पाच गुण जिंकत सामना 14-14 असा बरोबरीत आणला. ही बरोबरी 19 व्या गुणापर्यंत तशीच होती. अखेरीस सिंधूने तिसरा गेम 19-21 असा जिंकत सेमीफायनल गाठली.
मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपनमध्ये सिंधू सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर सिंधू आता सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. आता सिंधूचा सामना जपानच्या साएना कवाकामीशी होणार आहे. दुसरीकडे भारताची वरिष्ठ खेळाडू सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय हे देखील सेमीफायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी आज प्रतिस्पर्ध्यांशी भिडणार आहेत.