गुजरातमध्ये भरवले होते बनावट आयपीएल | पुढारी

गुजरातमध्ये भरवले होते बनावट आयपीएल

अहमदाबाद : वृत्तसंस्था : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगशी संबंधित अनेक वाद आणि घोटाळे आपण ऐकले आहे, पाहिले पण असतील. बनावट क्रिकेट लीग, बनावट मैदान, बनावट क्रिकेटपटू पण त्यावर सट्टा लावणे खरे आहे आणि तेही परदेशातून. चित्रपटाला साजेसी घटना वास्तवात घडली आहे. गुजरातमधील वडनगरमधील एका गावात अनेक दिवसांपासून आयपीएलचे बनावट क्रिकेट लीग चालवले जात होते. गुजरात पोलिसांनी बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात एका आरोपीचा शोध सुरू आहे, जो रशियात राहतो आणि तेथून सट्टेबाजीचा संपूर्ण खेळ चालवत होता.

पंधरवड्याहून अधिक काळ आयपीएलच्या रूपात यू ट्यूब चॅनेलवर बनावट क्रिकेट सामने थेट प्रक्षेपित केले जात होते. गावातील शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांना तयार करून चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट घालायला दिले. वॉकी-टॉकी आणि पाच एचडी कॅमेरेही वापरले. यासोबतच मॅच ऑथेंटिक होण्यासाठी ‘अ‍ॅम्बियन्स साऊंड’ देखील जोडण्यात आला होता. हर्षा भोगलेची नक्कल करण्यासाठी मेरठमधील एका समालोचकाला पण आणला होता आणि टेलिग्राम चॅनेलवर थेट सट्टेबाजी सुरू केली.

गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे तार रशियाशी संबंधित असून रशियातील ट्व्हर, वोरोनेज आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे.

Back to top button