England vs India 3rd T20I : सूर्य तळपला, पण पराभवाचा अंधार दाटला; इंग्लंड १७ धावांनी विजयी | पुढारी

England vs India 3rd T20I : सूर्य तळपला, पण पराभवाचा अंधार दाटला; इंग्लंड १७ धावांनी विजयी

नॉटिंगहॅम; वृत्तसंस्था : इंग्लंडने  (England vs India 3rd T20I)  दिलेल्या 216 धावांच्या आव्हानानंतर सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली; परंतु तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. विराट, रोहित, पंत, कार्तिकसह इतर फलंदाजांनी निराशा केल्याने तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताचा 17 धावांनी पराभव झाला, पण पहिले दोन सामने जिंकल्याने मालिका 2-1 अशी भारताच्या नावावर झाली.


216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची  (England vs India 3rd T20I) सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत (1) आणि विराट कोहली (11), रोहित शर्मा (11) हे आघाडीचे तिघे 31 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले. पण यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोन मुंबईकरांनी इंग्लंडवर प्रतिहल्‍ला केला. सूर्यकुमार यादवने 32 चेंडू, सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.

चौकार षटकारांची बरसात करीत सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी 55 चेंडूंत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली. श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला चौथा धक्‍का बसला. अय्यरने 28 धावा केल्या आणि झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने अवघ्या 48 चेंडूंत शतक पूर्ण केले. टी-20 मधील हे त्याचे पहिले शतक आहे. चौथ्या क्रमांकावर भारतासाठी शतक करणारा के. एल. राहुल नंतर तो दुसरा फलंदाज ठरला. दिनेश कार्तिक (6) आणि रवींद्र जडेजा (7) यांनी सूर्यकुमारला साथ दिली नाही. शेवटच्या 12 चेंडूंत 41 धावांची आवश्यकता असताना मोईन अलीच्या 19 व्या षटकांत सूर्याने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला, परंतु पाचव्या चेंडूवर त्याचा घात झाला आणि स्लाटकरवी तो झेलबाद झाला. सूर्यकुमारने 55 चेंडूंत 117 धावा करताना 14 चौकार आणि सहा षटकार ठोकले. सूर्यकुमार बाद झाल्यावर इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता उरली होती. जॉर्डनने दोन विकेट घेत ती पूर्ण केली. भारताच्या 20 षटकांत 9 बाद 198 धावा झाल्या.

तत्पूर्वी, सलग दोन टी २० सामन्यात मिळालेल्या पराभवाचे चांगलेच उट्टे इंग्लंडच्या फलंदाजांनी तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात (England vs India 3rd T20I) काढले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरफूस समाचार घेत ७ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २१५ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लडच्या माऱ्यासमोर भारताच्या गोलंदाजांना फारसा चांगला प्रभाव टाकता आला नाही. डेव्हिड मलान यांच्या ७७ धावा आणि लिव्हिंग स्टोन याच्या नाबाद ४२ धावांमुळे इंग्लंडने २१५ पर्यंत मजल मारली. दोन्ही सामन्यात आव्हानाचा बचाव करत सामने जिंकणाऱ्या भारताला या सामन्यात मात्र इंग्लंडने दिलेल्या २१६ धावांचे लक्षाचा पाठलाग करावा लागणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडला क्लीन स्वीप देऊ शकेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंड संघाने भारतीय संघाच्या (England vs India 3rd T20I) कमी अनुभवी असलेल्या गोलंदाजीच्या सुरुवाती पासूनच मर्यादा उघड केल्या. इंग्लंडचे फलंदाज सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर दबाव ठेऊन चांगलीच धुलाई केली. सलामीवीर जॉस बटलर आणि जेसन रॉय यांनी चांगली सुरुवात केली. चौथ्या षटकात आवेश खान याने धोकादायक ठरु पाहणाऱ्या जॉस बटलरला बाद केले, बटलरने ९ चेंडूत १८ धावा बनवल्या. त्यांनतर आलेल्या डेव्हिड मलान याने रॉयच्या साथीने चांगली भागीदारी रचली. आठव्या षटकात चांगला स्थिरावलेला जेसन रॉय उमरानच्या मलिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २६ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला फिलीप सॉल्ट हा फारकाळ तग धरु शकला नाही. त्याला अवघ्या ८ धावांवर गोलंदाज हर्षल पटेलने बाद केले.

यावेळी इंग्लंडच्या संघाने ३ बाद ८४ धावा केल्या होत्या. सामन्यात पुनरागमन करण्याची भारताला संधी होती पण, डेव्हिड मलान आणि त्याची साथ देण्यासाठी आलेल्या लिव्हिंगस्टोन यांनी ते होऊ दिले नाही. या जोडीने भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडविल्या. या जोडीने ८४ धावांची भागिदारी रचली. याच दरम्यान डेव्हिड मलाने आपले अर्धशतक देखिल पूर्ण केले. या भागिदारीच्या जोरावच इंग्लंडने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान १७ व्या षटकात डेव्हिड मलान मोठा फटका मारायला जाऊन झेल बाद झाला. मलानने ३९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. तसेच दुसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने नवा फलंदाज मोईन अली याला आल्या आल्या माघारी धाडले.

मोईन अली नंतर आलेल्या हॅरी ब्रुकने ताबडतोब फटकेबाजी करत काही मोठे फटके मारले. त्याने ९ चेंडूत १९ धावा केल्या आणि अखेर हर्षल पटेलने त्याला बाद केले. अखेरच्या षटकात येणाऱ्या फलंदाजांच्या साथीने लिव्हिंगस्टोनने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. ख्रिस जॉर्डन हा धावबाद झाला त्याला रवींद्र जडेजाने बाद केले. त्याने ३ चेंडूत ११ धावा केल्या. लिव्हिंग स्टोनने २९ चेंडूत ४२ धावा करत नाबाद राहिला. इंग्लंडने अखेर २० षटकात ७ बाद २१५ धावांचे विशाल आव्हान उभे केले.

भारताने या सामन्यात गोलंदाजीमध्ये नव्या व बाकावर बसलेल्या उमरान मलिक, आवेश खान, रवी बिश्नोई यांना संधी दिली. त्यांच्यासोबत हर्षल पटेल व रवींद जडेजा यांना कायम ठेवले. पण, ही गोलंदाजी इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभाव टाकण्यास निष्रभ ठरली. उमरान मलिक हा महागडा गोलंदाज ठरला त्याने ४ षटकात ५६ धावा देत १ बळी मिळवला. रवी बिश्नोईने ३० धावा देत २ बळी घेतले. हर्षल पटेलने देखिल ३५ धावा देत २ बळी घेतले व आवेश खान याने ४३ धावा देत १ बळी घेण्यात यशस्वी ठरला. अनुभवी रवींद्र जडेजा याने ४५ धावा दिल्या पण त्याला एक देखील बळी घेता आला नाही.

Back to top button