सानिया मिर्झा उपांत्य फेरीत | पुढारी

सानिया मिर्झा उपांत्य फेरीत

लंडन ; वृत्तसंस्था : टेनिस जगतामध्ये सध्या विम्बल्डनचा थरार सुरू आहे. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत भारताची तारांकित खेळाडू सानिया मिर्झा धडाकेबाज कामगिरी करत आहे. तिने क्रोएशियन साथीदार मेट पेव्हिकसह विम्बल्डनमधील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने गॅब्रिएला डुब्रोव्हस्की आणि जॉन पिअर्स या जोडीचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव केला.

सानिया आणि पेव्हिक या सहाव्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिएला डुब्रोव्हस्की-जॉन पिअर्स यांचा एक तास 41 मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभव केला. आता उर्वरित दोन सामने जिंकून सानियाला तिचे शेवटचे विम्बल्डन संस्मरणीय बनवायचे आहे. तिने प्रथमच विम्बल्डन ओपनच्या मिश्र दुहेरी प्रकारात उपांत्य फेरी गाठली. सानिया मिर्झाची ही शेवटची विम्बल्डन स्पर्धा आहे. या मोसमानंतर टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे तिने आधीच जाहीर केले आहे.

उपांत्य फेरीत सानिया आणि पेव्हिकची जोडी दुसर्‍या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी भिडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना डेजारे-नील स्कुप्स्की या द्वितीय मानांकित जोडी आणि सातव्या मानांकित जेलेना ओस्टापेन्को-रॉबर्ट फराह यांच्यात आहे. सानियाने महिला दुहेरी गटातही भाग घेतला होता. परंतु, ती आणि तिची चेक जोडीदार लुसी हाडेका पहिल्याच सामन्यात बाहेर गेल्या होत्या.

रोमानियाची सिमोना हालेप उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन ; वृत्तसंस्था : रोमानियाच्या सिमोना हालेप हिने एकतर्फी झालेल्या सामन्यात चतुर्थ मानांकित पाउला बाडोसा हिला 6-1, 6-2 असे सरळ सेटमध्ये हरवून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ऑल इंग्लंड क्लबमध्ये सलग अकरावा सामना जिंकणार्‍या हालेपने पाचव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

हालेपने 2019 मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धा रद्द करण्यात आली होती, तर डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे हालेपने गेल्यावर्षी स्पर्धेत भाग घेतला नव्हता.

बाडोसाविरुद्धच्या सामन्यात हालेपने पूर्ण वर्चस्व मिळवले होते. हालेपने 55 मधील 30 गुण सर्व्हिसवर मिळवले. हालेप ही पुढील सामन्यात अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा हिच्याशी भीडणार आहे. 20 वर्षीय अमांडाने फ्रान्सच्या हार्मोनी टेन हिला 6-2, 6-3 असे हरवले. हार्मोनीने दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सला हरवून खळबळ उडवून दिली होती.

Back to top button