

लंडन : चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोझकोवा हिने ग्रँडस्लॅमची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. बोझकोवा हिने महिला एकेरीच्या चौथ्या फेरीच्या लढतीत कॅरोलिन गार्सियाला पराभूत करीत विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोझकोवा हिने गार्सियावर 7-5, 6-2 अशा फरकाने विजय मिळवला.
बोझकोवा हिने 1 तास व 23 मिनिटांमध्ये या लढतीत विजय मिळवला. याआधी तिला ग्रँडस्लॅमची दुसरी फेरीही ओलांडता आली नव्हती. जर्मनीच्या तातजाना मारिया हिच्याकडून महिला एकेरीत माजी फ्रेंच ओपन विजेती येलेना ओस्तापेंको हिला पराभवाचा धक्का बसला. मारिया हिने ओस्तापेंकोचे कडवे आव्हान 5-7, 7-5, 7-5 अशा तीन सेटमध्ये परतवून लावले. पहिला सेट गमावल्यानंतर मारियाने ही लढत जिंकली हे विशेष. तिने 2 तास व 8 मिनिटांमध्ये 12 व्या मानांकित ओस्तापेंकोला नमवले. महिला एकेरीत युनायटेड किंगडमच्या हेथर वॉटसनची घोडदौड रविवारी थांबली. जर्मनीच्या ज्यूल निमिएर हिने वॉटसनवर 6-2, 6-4 अशा फरकाने विजय साकारत पुढल्या फेरीत वाटचाल केली. तिने एक तास व 17 मिनिटांमध्ये वॉटसनला पराभूत केले. वॉटसनच्या पराभवामुळे प्रेक्षकांची निराशा झाली.
हेही वाचा