भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ( ENGvsIND 3rd test ) इंग्लडने भारताचा पहिला डाव ७८ धावात गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या सलामी जोडीने दमदार फलंदाजी करत नाबाद शतकी भागीदारी रचली. या दोघांनी दिवस अखेर इंग्लंडला १२० धावांपर्यंत पोहचवले आणि ४२ धावांची आघाडी मिळवून दिली. हमीदने ६० तर बर्न्स ५२ धावांवर नाबाद राहिले.
लॉर्ड्सवरील जिव्हारी लागलेल्या पराभवाचे एक प्रकारे इंग्रजांनी लीड्स कसोटीत उट्टे काढले. इंग्लंडकडून अनुभवी जेम्स अँडरसनने भारताची वरची फळी संपवली. त्याने अवघ्या. ६ धावात ३ विकेट घेतल्या. त्यानंतर क्रेग ओव्हरटर्नने भारताची शेपूट झटपट गुंडाळली त्यानेही १४ धावा देत ३ बळी टिपले.
या दोघांना रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली. भारताकडून रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेलाच दुहेरी आकडा गाठता आला. रोहित शर्मा १९ धावा तर अजिंक्य रहाणे १८ धावा करुन बाद झाले.
जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकात लॉर्ड्सवरील शतकवीर केएल राहुलला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराचीही ( १ ) अँडरसननेच पाचव्या षटकात शिकार केली.
अँडरसनने भारताला सुरुवातीलाच दोन धक्के दिल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेम्स अँडरसनने विराट कोहलीची पुन्हा एकदा शिकार करत भारताला मोठा धक्का दिला. विराट बाद झाल्यानंतर भारताचा डाव सवारण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेवर आली.
या दोघांनी सावध फलंदाजी करत भारताचे अर्धशतक २५ व्या षटकात धावफलकावर लावले. ही मुंबईकर जोडी भारताच्या मदतीला धावून येणार असे वाटत असतानाच ऑली रॉबिन्सनने अजिंक्य रहाणेला १८ धावांवर बाद करुन लंच टाईमच्या आधीच ही जोडी फोडली.
लंचपूर्वी भारताने अजिंक्य रहाणेला गमावले होते. त्याला ऑली रॉबिन्सनने १८ धावांवर बाद केले. लंचनंतर रॉबिन्सनने आपला हा फॉर्म कायम राखत भारताची कमबॅकची आशा असलेल्या ऋषभ पंतला अवघ्या २ धावांवर बाद करत भारताचा पाचवा फलंदाज तंबूत धाडला. यामुळे भारताची अवस्था ५ बाद ५८ अशी बिकट झाली.
इंग्लंडच्या तोफखान्यातील अँडरसन आणि रॉबिन्सन यांनी चमक दाखवल्यानंतर क्रेग ओव्हरटर्नने देखील आपला जवला दाखवला. त्याने ३६ व्या षटकात चौथ्या चेंडूवर १९ धावांवर खेळणाऱ्या रोहित शर्माला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला शुन्यावर बाद करत भारताला सातवा धक्का दिला.
ओव्हटर्न नंतर सॅम करनने ३७ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाला ४ धावांवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला शुन्यावर बाद केले. तो हॅट्ट्रिकवर होता पण, सिराजने ही हॅट्ट्रिक होऊ दिली नाही. पण, ओव्हरटर्नने त्याला ३ धावांवर बाद करत भारताचा डाव ७८ धावात गुंडाळला.
त्यानंतर इंग्लंडने चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात ७ षटकात बिनबाद २१ धावा केल्या.
चहापानानंतर इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी चांगली सुरुवात केली. हमीदने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. त्याला इशांत शर्माने स्वैर गोलंदाजी करत मदतच केली. हमीद पाठोपाठ सेट झाल्यावर बर्न्सनेही आपला धावांचा वेग वाढवला.
या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. मोहम्मद सिराज टिच्चून मारा करत होता. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. इंग्लंडच्या सलामीवीरांनी ३१ व्या षटकात भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येची ( ७८ ) बरोबरी केली. त्यानंतर या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत नाबाद शतकी सलामी दिली.
दरम्यान, ४७ धावांवर असलेल्या हमीदचा बुमराहच्या गोलंदाजीवर रोहितने स्लीपमध्ये झेल सोडला आणि त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर बर्न्सनेही आपले अर्धशतक चोकार मारत पूर्ण केले. या दोघांनी पहिल्या दिवशी नाबाद १२० धावांची सलामी देत दिवस अखेर पर्यंत इंग्लंडला ४२ धावांची आघाडी मिळवून दिली.
पाहा व्हिडिओ : देखण्या हरिश्चंद्रगडाची सफर एकदा कराच