रजत पाटीदारचेही शतक | पुढारी

रजत पाटीदारचेही शतक

बंगळूर : वृत्तसंस्था :  रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी मध्य प्रदेशने सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. मुंबईने पहिल्या डावात केलेल्या 374 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना मध्य प्रदेशने पहिल्या डावात 536 धावा केल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली. तिसर्‍या दिवसअखेर 3 बाद 368 धावांपर्यंत मध्य प्रदेशने मजल मारली होती. चौथ्या दिवशी मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारने आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले. त्याच्या या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने आपली पहिल्या डावातील आघाडी शतकाच्या पार नेली. यानंतर सारांश जैनने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मध्य प्रदेशचा सलामीवीर यश दुबे (133), शुभम शर्मा (116) यांनी तिसर्‍याच दिवशी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले होते. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मध्य प्रदेशने 3 बाद 368 धावा केल्या होत्या. मुंबईवर आघाडी घेण्यासाठी फक्‍त 6 धावांची गरज होती. तिसर्‍या दिवसअखेर रजत पाटीदार अर्धशतक करून नाबाद होता. या अर्धशतकाचे रूपांतर रजतने शतकात केले. त्याच्या या शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने उपहारापर्यंत 6 बाद 475 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, दुसर्‍या सत्रात पाटीदार 122 धावा करून बाद झाला. त्यानंतर सारांश जैनने 57 धावांची खेळी करत मध्य प्रदेशला 500 चा टप्पा पार करून दिला. अखेर मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावात संपुष्टात आणला. मध्य प्रदेशने पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली.

दुसरीकडे, 41 रणजी ट्रॉफी विजेतेपदे पटकावणार्‍या मुंबईसाठी मध्य प्रदेशची वाढती आघाडी डोकेदुखी ठरत होती. सामन्यावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मुंबईला मध्य प्रदेशचा पहिला डाव गुंडाळणे गरजेचे होते. मात्र, मुंबईला
चौथ्या दिवशी उपहारापर्यंत फक्‍त 3 विकेटस् घेता आल्या होत्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अखेर मध्य प्रदेशला 536 धावांत रोखले. मुंबईकडून शम्स मुल्लाणीने 5, तुषार देशपांडेने 3, तर मोहित अवस्थीने 2 विकेटस् घेतल्या.

Back to top button