भारताच्या युवा ब्रिगेडची परीक्षा | पुढारी

भारताच्या युवा ब्रिगेडची परीक्षा

डब्लिन : वृत्तसंस्था :  भारतीय संघ आयर्लंडच्या दौर्‍यावर दाखल झाला असून, आता रविवारी होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्यासाठी सज्ज झाला आहे; पण पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात आता नवीन चेहरे पाहायला मिळू शकतात, असे संकेत मिळत आहेत. कारण, पहिल्याच सामन्यासाठी आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.

सलामीसाठी तीन पर्याय

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आता भारतीय संघात तीन सलामीवीर आहेत; पण यापैकी आता दोघांनाच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघात सलामीसाठी ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबरोबर आता राहुल त्रिपाठीचीही दावेदारी आहे. या तिघांपैकी दोघांना या सामन्यात संधी मिळणार आहे. गेल्या मालिकेत ईशान हा भन्‍नाट फॉर्मात होता. त्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यासाठी त्याचे स्थान निश्‍चित समजले जात आहे; पण ऋतुराज आणि राहुल या दोन्ही पुणेकरांमध्ये यावेळी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऋतुराजला जास्त पसंती दिली जाईल, असे दिसत आहे. त्यामुळे राहुलला अजूनही पदार्पणासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते.

मधल्या फळीत बरेच पर्याय

भारताच्या मधल्या फळीत यावेळी बरेच पर्याय कर्णधार हार्दिक पंड्याकडे उपलब्ध आहेत. मधल्या फळीत चार खेळाडूंना संधी दिली जाईल. यामध्ये कर्णधार हार्दिक आणि दिनेश कार्तिक यांचे स्थान निश्‍चित आहे. यावेळी सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांच्यामध्ये चांगली चुरस असेल. मात्र, सूर्यकुमारला तिसर्‍या स्थानावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते. त्यामुळे संजू सॅमसन आणि दीपक हुडा यांच्यापैकी एकाला संधी देण्यात येईल.

गोलंदाजीमध्येही चुरस

भारताच्या गोलंदाजीमध्येही यावेळी चुरस पाहायला मिळत आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. यामध्ये युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्‍वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल यांना पहिल्या सामन्यात संधी मिळेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे रवी बिष्णोई आणि उमरान मलिक यांना अजूनही खेळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे; पण दुसर्‍या सामन्यात काही खेळाडूंना संधी मिळू शकते, असे दिसत आहे.

हायलाईटस् :

  • या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल होणार आहे
  • पहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?
  • वर्ल्डकप संघात दावेदारी सांगण्याची युवा खेळाडूंना संधी

संघ यातून निवडणार :
भारत : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड/राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्‍वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि हर्षल पटेल.

Back to top button