भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला टी-20 सामना | पुढारी

भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला टी-20 सामना

दाम्बुला : वृत्तसंस्था

भारतीय आणि श्रीलंकन महिला संघामधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत गुरुवारी (दि.23) होणार आहे. सर्व प्रारूपातील नवी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्याने सुरुवात करणार आहे. बर्मिंगममध्ये होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तर, आगामी महिला टी-20 वर्ल्डकप अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

या दोन्ही स्पर्धांची तयारी करण्याच्या दिशेने पाऊल टाकताना भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. यावर्षी झालेल्या महिला वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. तर, श्रीलंकन संघाने पाकविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत 0-3 असा पराभव पत्करला आहे. या मालिकेत भारतीय संघाला श्रीलंकेच्या ओशादी रणसिंगे व चामरी अट्टापटू या अनुभवी खेळाडूंपासून सतर्क राहावे लागणार आहे.

भारताने यापूर्वी शेवटचा टी-20 सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे. यामध्ये टीम इंडियाला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाला स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, हरमन व वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांत तीन वन-डे सामने होतील. हे सामने 1, 4 व 7 जुलै रोजी होतील.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, सिमरन बहादूर, यास्तिका भाटिया, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष, साभिनेनी मेघना, मेघना सिंह, पूनम यादव, रेणुका सिंह, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव.

Back to top button