T-20 World Cup : वर्ल्डकपचा संघ 15 सप्टेंबरपूर्वी जाहीर करा | पुढारी

T-20 World Cup : वर्ल्डकपचा संघ 15 सप्टेंबरपूर्वी जाहीर करा

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यासाठी संघ निवडीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर असणार आहे. भारतीय निवड समिती आणि प्रशिक्षक यांना यापूर्वी खेळाडूंना पारखून घेण्याची संधी मिळणार आहे; परंतु त्यासाठी त्यांच्या हातात फक्‍त चार मालिका उरल्या आहेत.

भारतीय संघाच्या घरच्या मैदानावरील मालिका संपल्या आता परदेशवारी सुरू झाली आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूवर निवड समिती व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे बारीक लक्ष आहे. ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी संघांना 15 सप्टेंबरपर्यंत 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याचे निर्देश आयसीसीने (ICC) दिले आहे.

टीम इंडियाला अंतिम संघ जाहीर करण्यापूर्वी अजून चार मालिका खेळायच्या आहेत आणि त्यानंतर द्रविड व निवड समिती निर्णय घेणार आहे.

तीन वर्षांनंतर दिनेश कार्तिकने केलेले कमबॅक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. फिनिशरच्या भूमिकेत त्याला पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्‍त केली आहे. अशात ऋषभ पंत फॉर्मशी झगडताना दिसतो आहे.

हार्दिक पंड्या तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. त्यामुळे संघातील अष्टपैलू खेळाडूची जागा भरून निघाली; परंतु चुरस अधिक वाढली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार आदींचे संघातील स्थान निश्‍चित मानले जात आहे. 1-2 जागांसाठी चुरस रंगताना दिसणार आहे. त्यामुळे आगामी चार मालिकांवर निवड समितीचे बारीक लक्ष असेल.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. इंग्लंडविरुद्धचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत कायम ठेवला जाईल. हाच संघ आशिया चषक स्पर्धेत खेळेल आणि त्यानंतर वर्ल्डकप संघाची घोषणा होईल.

15 सप्टेंबरपूर्वी या प्रश्‍नाची उत्तरे शोधावी लागतील (T-20 World Cup)

* रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना बॅकअप ओपनर कोण?

* फॉर्मचा विचार केल्यास कोहली तिसर्‍या क्रमांकावर योग्य आहे का?

* चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांच्यात कोणाला प्राधान्य?

* दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक कोण असणार?

* युजवेंद्र चहलसोबत दुसरा फिरकीपटू कोण?

* जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार हे वगळता दोन जलदगती गोलंदाज कोण?

Back to top button