आशिष नेहरा म्हणाला, टी-20 वर्ल्डकपमध्ये शमीला संधी मिळणे कठीण | पुढारी

आशिष नेहरा म्हणाला, टी-20 वर्ल्डकपमध्ये शमीला संधी मिळणे कठीण

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अलीकडच्या काही वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, काही काळापासून शमीला टी-20 इंटरनॅशनलमध्ये संधी मिळालेली नाही. भारताच्या युवा गोलंदाजांची कामगिरी बघता मोहम्मद शमीला टी-20 विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केले आहे.

नेहरा म्हणाला की, मोहम्मद शमीला आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळणे अवघड आहे. पण, शमीच्या क्षमतेबद्दल आपण सगळेच जाणतो. तो यंदाच्या टी-20 विश्वचषकात दिसला नाही, तरी 2023 साली भारतात होणार्‍या वन-डे विश्वचषकासाठी संघात त्याच्या नावाचा नक्कीच विचार होईल. विशेष म्हणजे, शमी आयपीएल 2022 मध्ये आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्स संघाचा भाग होता.

‘वन-डे क्रिकेटमध्ये संधी मिळू शकते’

नेहरा पुढे म्हणाला, ‘भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आपल्या सर्वोत्तम खेळाडूंसह खेळायला आवडेल. शमी नक्कीच त्यापैकी एक आहे. या वर्षी भारत जास्त एकदिवसीय सामने खेळणार नाही. कसोटी सामन्यानंतर भारत त्याला इंग्लंडमध्ये 50 षटकांच्या सामन्यांमध्ये संधी देऊ शकतो. इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध भारताला चांगली टीम मैदानात आणावी लागेल, शमी त्यात नक्की असेल.

शमीने गेल्या वर्षी शेवटचा सामना खेळला

शमी सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून, तेथे तो इंग्लंडविरोधात पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी तयारी करत आहे. हा पाचवा कसोटी सामना गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या कसोटी मालिकेचा भाग आहे. 31 वर्षीय शमीने 2021 टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून शमीला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.

Back to top button