तीन देशांत होणार 2026 चा फिफा वर्ल्डकप | पुढारी

तीन देशांत होणार 2026 चा फिफा वर्ल्डकप

मॉस्को (वृत्तसंस्था) : 2026 चा फिफा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. या आशयाची घोषणा नुकतीच करण्यात आली.

फिफाच्या इतिहासात संयुक्तपणे यजमानपद सोपविण्याची ही पहिलीच वेळ असेल. पुढील आयोजनासाठी फिफाने 16 यजमान शहरांची घोषणा केली. आता 32 ऐवजी 48 संघांचा स्पर्धेत सहभाग असेल. 2022 चा विश्वचषक कतारमध्ये 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येत असून, त्यात 32 संघ सहभागी होतील. 2026 मध्ये 90 पैकी 60 सामन्यांचे आयोजन अमेरिकेत, तर कॅनडा आणि मेक्सिकोत प्रत्येकी 10 सामन्यांचे आयोजन होईल. अमेरिकन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोर्डेरियो यांनी ही अद्भुत घोषणा असल्याचे संबोधून अमेरिकन फुटबॉल विश्वासाठी हा मोठा क्षण असल्याचे सांगितले.

सामना स्थळे –

अमेरिका : अटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एंजिलिस, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल.

मेक्सिको : गौडालाजारा, मेक्सिको सिटी, माँटेरी.

कॅनडा : टोरांटो, व्हँकूअर.

सर्वात लोकप्रिय स्पर्धा

फुटबॉल जगात लोकप्रिय खेळ असून, फिफा विश्वचषकदेखील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे. प्रेक्षक क्षमता आणि लोकप्रियतेच्या तुलनेत फिफाचे आयोजन ऑलिम्पिकला टक्कर देते. 1930 पासून सुरू झालेली ही स्पर्धा जगाच्या कानाकोपर्‍यात लक्षवेधी ठरते. दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागच्या वेळी ही स्पर्धा फ्रान्सने जिंकली होती. 1930 चा पहिला विश्वचषक विजेता उरुग्वे होता.

मोरोक्कोला अपयश

मॉस्कोतील फिफा काँग्रेसमध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांनी 2026 च्या यजमानपदाची संयुक्तपणे दावेदारी सादर केली. या तीन देशांनी मोरोक्कोला पराभूत केले. 200 वर राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी मतदान केले. या तीन देशांना 134, तर मोरोक्कोला केवळ 65 मते मिळाली.

20 वर्षांपूर्वीचे आयोजन

जपान-दक्षिण कोरिया यांनी 20 वर्षांआधी 2002 मध्ये संयुक्तपणे फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते. मॉस्को शहरात झालेल्या फिफाच्या 68 व्या काँग्रेसमध्ये जगातील राष्ट्रीय फुटबॉल महासंघांनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या बाजूने मतदान केले.

Back to top button