रणजी करंडक : मुंबईची उ. प्रदेशवर मजबूत पकड | पुढारी

रणजी करंडक : मुंबईची उ. प्रदेशवर मजबूत पकड

बंगळूर ; वृत्तसंस्था : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशला बॅकफूटवर फेकले आहे. पहिल्या डावातील 213 धावांच्या आघाडीत मुंबईने चौथ्या दिवसात दुपारपर्यंत 449 धावांची भर घातली आहे. चौथ्या दिवसअखेरीस मुंबईकडे आता एकूण 662 धावांची आघाडी आहे. मुंबईच्या दुसर्‍या डावात कर्णधार पृथ्वी शॉ याने विक्रमी कामगिरी केल्यानंतर यशस्वी जैस्वालने चौथ्या दिवशी ऐतिहासिक पराक्रम केला. 54 चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेणार्‍या यशस्वीने चौथ्या दिवशी 181 धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी त्याला एस.एम. कादरी, दत्तू फडकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आदी दिग्गजांच्या पंक्तीत नेऊन बसवणारी ठरली.

हार्दिक तामोरे (115) व यशस्वी (100) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना अपयश आले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी व कोटियन यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेताना उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले. दुसर्‍या डावात मुंबईसाठी कर्णधार पृथ्वीने दमदार सुरुवात केली. त्याने 71 चेंडूंत 12 चौकारांसह 64 धावा केल्या. मुंबईच्या फलकावर 66 धावांपैकी 64 धावा या पृथ्वीच्या होत्या. नॉन स्ट्राईकला असलेल्या यशस्वीने 54 चेंडूंनंतर पहिली धाव घेतली अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबईने दिवसअखेर 1 बाद 133 धावा केल्या. पण चौथ्या दिवशी यशस्वीचा नूर पालटला.

यशस्वी व अरमान यांनी दुसर्‍या विकेटसाठी विक्रमी 286 धावांची भागीदारी केली. अरमान 259 चेंडूंत 15 चौकार व 2 षटकारांसह 127 धावांवर बाद झाला. यशस्वीनेही शतक झळकावले. त्याने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती आणि मुंबईकडून रणजी करंडकात दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो 9 वा फलंदाज ठरला आहे. यशस्वी 181 धावा करून बाद झाला. मुंबईच्या 4 बाद 449 धावा झाल्या असून आघाडी 662 धावांपर्यंत पोहोचली आहे.

रोहित, सचिनला न जमलेला विक्रम जैस्वालच्या नावावर

बंगळूर येथील जस्ट क्रिकेट अकादमीत खेळल्या जात असलेल्या उपांत्य सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वीने उत्तर प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावून ‘रेकॉर्ड बुक’मध्ये आपले नाव नोंदवले. यशस्वीने 240 चेंडूंत शतक पूर्ण केले. रणजी करंडकातील दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो मुंबईचा नववा फलंदाज ठरला.

रणजी करंडकाच्या या हंगामातील यशस्वी जैस्वालचे हे सलग तिसरे शतक आहे. त्यामुळे रणजी करंडकामध्ये सलग तीन शतके ठोकणारा तो मुंबईचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी गुलाम पारकर यांनी मुंबईसाठी अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरही मुंबईसाठी सलग तीन शतकांचा पराक्रम करू शकलेले नाहीत.

जैस्वालने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यातील दुसर्‍या डावात 150 चेंडूंत 103 धावा केल्या होत्या. आपल्या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी त्याने हातभार लावला होता. रणजीच्या या हंगामात यशस्वीने दोन सामन्यांतील चार डावांत 390 धावा केल्या आहेत.

Back to top button