बीसीसीआय : मी लावलेल्या झाडाची फळे खात आहेत | पुढारी

बीसीसीआय : मी लावलेल्या झाडाची फळे खात आहेत

लंडन : वृत्तसंस्था : मुंबईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांच्या विक्रीसाठी झालेल्या लिलावात बीसीसीआयला 48 हजार कोटींची बोली मिळाली. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे माजी अध्यक्ष असलेल्या ललित मोदींचे एक ट्विट चर्चेत आले आहे.

आयपीएलसाठी ललित मोदींचे आभार मानले पाहिजेत, असे ट्विट एका ट्विटर वापरकर्त्याने केले होते. त्याला उत्तर देताना ललित मोदी म्हणाले की, मी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची फळे आता बीसीसीआय खात आहे. परंतु, बीसीसीआयने समालोचकांना माझे नाव घेण्यासही बंदी घातली आहे. ही मोठी लीग सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनही आपले नाव घेतले जात नाही, तरीही मला त्याचा फारसा फरक पडत नाही. ललित मोदी म्हणाले की, हे संकुचित मनाचे लोक आहेत. त्यांची मानसिकता वाईट आहे; पण यामुळे मी आयपीएलची उभारणी केली हे तथ्य बदलणार नाही. माझ्यासाठी हेच पुरेसे आहे. आयपीएलमधील आर्थिक घोटाळा केल्याचा ललित मोदी यांच्यावर आरोप असून, ते सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत.

Back to top button