Stuart Broad Pub : प्रसिद्ध क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉडचा ‘पब’ भीषण आगीत जळून खाक! | पुढारी

Stuart Broad Pub : प्रसिद्ध क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉडचा 'पब' भीषण आगीत जळून खाक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि न्यूझीलंड सध्या ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत आमनेसामने आहेत. या सामन्यात अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या डावात चेंडूच्या माध्यमातून हुकूमत गाजवू शकला नाही. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आपल्या 26 षटकात 107 धावा देत दोन विकेट घेतल्या आणि अशा प्रकारे न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिल्या डावात 553 धावा केल्या. पण अशातच ब्रॉडला वैयक्तिकरित्या आणखी एक धक्का सहन करावा लागला आहे. (Stuart Broad Pub fire)

स्टुअर्ट ब्रॉडच्या पबला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी अथवा कोणीही जखमी झालेले नाही. पण ब्रॉडला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. (Stuart Broad Pub fire)

स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटर हॅरी गुर्नी दोघेही ‘टॅप अँड रन’ नावाच्या पबचे मालक आहेत. हा पब मेल्टन मॉब्रे जवळ अप्पर ब्रॉटनमध्ये आहे. नॉटिंगहॅमशायरमधील एका पबच्या पहिल्या मजल्यावर आणि छताला पहाटे 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. (Stuart Broad Pub fire)

ही घटना 11 जून रोजी घडली, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने ट्विटरवर या घटनेचे छायाचित्र शेअर करून दुःख व्यक्त केले. तसेच पबच्या परीसरातील नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या सेवेबद्दल त्याने आभारही मानले.

स्टुअर्ट ब्रॉडने ट्विटरवर लिहिले की, पबला आग लागल्याचे समजल्यानंतर मला विश्वासच बसला नाही. पण ते सत्य आहे याची माहिती माझ्या जवळच्या लोकांनी दिली. ते दु:ख पचवणे कठिण होते. पण सुदैवाने त्या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, नॉटिंगहॅमशायर अग्निशमन दलाने आग विझवण्याचे मोलाचे कार्य केले. पबच्या परीसरातील नागरिकांनीही त्यांना सहकार्य केले. त्यांच्या या कार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. (Stuart Broad Pub fire)

अनुभवी वेगवान गोलंदाजाने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने म्हटलंय की, मी व्यत्ययाबद्दल दिलगीर आहे. पबच्या कर्मचार्‍यांचा विचार करून मला त्रास होतो आहे. कारण तिथल्या प्रत्येकाने राबून तो एक खास पब बनवला आहे. सध्यातरी, या घटनेमुळे आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे, परंतु आम्हाला आनंद आहे की सर्वजण सुरक्षित आहेत आणि आम्ही पुन्हा लोकांच्या सेवेत येऊ, असा विश्वासही स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला आहे. (Stuart Broad Pub fire)

Back to top button