IND vs SA : मालिका गमावण्याची भीती | पुढारी

IND vs SA : मालिका गमावण्याची भीती

विशाखापट्टणम ; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे (IND vs SA) पहिले दोन टी-20 सामने गमावल्यानंतर मंगळवारी (दि. 14) होणार्‍या तिसर्‍या सामन्यात मात्र भारतीय संघाला विजय मिळवावाच लागेल. ऋषभच्या नेतृत्वाखालील युवा संघाला जर विजयी कामगिरी करता आली नाही, तर भारतावर मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की येणार आहे.

वर्ल्डकपसाठी संघबांधणी करीत असलेल्या राहुल द्रविड यांना पहिल्या दोन सामन्यांतून संघाच्या अनेक उणिवा दिसून आल्या. भारताची सलामी जोडी फ्लॉफ ठरत आहे, स्पीनर्स फॉर्मात नाहीत, युवा वेगवान गोलंदाजांना विकेट मिळत नाहीत, स्वत: कर्णधार अपयशी ठरत आहे, अशा अनेक समस्या जाणवत आहेत.

पहिल्या सामन्यात भारत खराब गोलंदाजीमुळे हरला, तर दुसर्‍या सामन्यात फलंदाजांनी निराश केले. सलामीला ईशान किशन चांगली सुरुवात करतोय; परंतु तो मोठी धावसंख्या उभारण्यात कमी पडतोय. के. एल. राहुल नसल्यामुळे संधी मिळालेला ऋतुराज गायकवाड सपशेल अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या सामन्यात 23, तर दुसर्‍या सामन्यात फक्त एक धाव केली आहे.

गोलंदाजीत फिरकी जोडीने निराश केले आहे. डेव्हिड मिलर, रॅसी वॅन डे ड्युसेन आणि हेनरिक क्लासेन यांनी त्यांच्याविरोधात सहज धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात यापैकी एका गोलंदाजाला बाहेर करून लेगस्पीनर रवी बिष्णोई किंवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरला संधी मिळू शकते. वेंकटेश सलामीलाही खेळू शकतो.

ताज्या दमाच्या खेळाडूंना मागे टाकत निवृत्तीकडे चाललेला भुवनेश्वरकुमार चमकदार कामगिरी करीत आहे. भारतीय गोलंदाज एक दोन निर्णायक षटकांत धावांचा रतीब घालून केलेल्या मेहनतीवर पाणी टाकत आहेत. आता मालिकेतील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. आयपीएलपासून ज्याची चर्चा रंगली आहे, अशा उमरान मलिकला संधी देण्याची वेळ आता आली आहे. दोन्ही सामन्यांत विकेटलेस राहिलेल्या मोहसीन खानला वगळून उमरानचे पदार्पण होऊ शकते.

दोन्ही संघ यातून निवडणार (IND vs SA)

भारत : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्त्जे, वेन पार्नेल, ड्वेेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी वॅन डे ड्युसेन, मार्को यानसेन.

Back to top button