ENG vs NZ : इंग्लंडच्या जो रूटचे सलग दुसरे शतक

ENG vs NZ : इंग्लंडच्या जो रूटचे सलग दुसरे शतक

नॉटिंगहॅम ; वृत्तसंस्था : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या (ENG vs NZ) दुसर्‍या कसोटीत सलग दोन शतके झळकावून संघाची स्थिती मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी न्यूझीलंडच्या 553 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 5 बाद 473 धावा केल्या आहेत. ऑली पोपच्या शतकी खेळीनंतर माजी कर्णधार रूटने 176 धावा केल्या. तो बोल्टचा बळी ठरला. रूटशिवाय ऑली पोपनेही शतक झळकावले. 13 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 145 धावांची खेळी करत तो ट्रेंट बोल्टचा बळी ठरला.

इंग्लंड मजबूत स्थितीत

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ फक्त 80 धावांनी मागे होता. चौथ्या दिवशी इंग्लंडचा डाव 553 धावांवर संपला. त्यांना 14 धावांची अल्पआघाडी मिळाली. त्यानंतर न्यूझीलंडने दमदार खेळी करीत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा 2 बाद 104 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे.

2021 पासून रूटची 10 शतके (ENG vs NZ)

1 जानेवारी 2021 पासून जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली आहेत. या दोन वर्षांत फॅब 4 मधील खेळाडूंनी ठोकलेली ही सर्वाधिक शतके आहेत. रूटने या काळात 6 वेळा 150 धावांचा टप्पा ओलांडताना दोन द्विशतकेही झळकावली. इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करताना रूटने आपला खतरनाक फॉर्म कायम ठेवला आहे.

विराट, स्मिथचा विक्रम धोक्यात

रूटच्या शतकाने माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाला धोका निर्माण झाला आहे. या कसोटीपूर्वी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ 27 कसोटी शतकांसह अव्वल स्थानावर होते; परंतु आता या शतकासह रूटने त्यांची बरोबरी केली आहे. 119 व्या सामन्यातील रूटचे हे 27 वे शतक ठरले आहे. इंग्लंडचा हा माजी कर्णधार गेल्या दोन वर्षांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. रूटचा फॉर्म पाहता या मालिकेतून तो कोहली आणि स्मिथच्या पुढे बाजी मारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news