AUS vs SL : ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत श्रीलंकेने शेवटच्या १८ चेंडूत केल्या ५९ धावा | पुढारी

AUS vs SL : ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत श्रीलंकेने शेवटच्या १८ चेंडूत केल्या ५९ धावा

कोलंबो ; वृत्तसंस्था : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तीन सामन्यांच्या (AUS vs SL) टी-20 मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (11 जून) खेळविण्यात आला. हा सामना यजमान श्रीलंकेने चार गडी राखून जिंकला. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. कारण, त्यांनी शेवटच्या तीन षटकांत म्हणजे 18 चेंडूंत 59 धावा ठोकत लक्ष्य गाठले. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने शेवटच्या तीन षटकांत 59 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. श्रीलंकेच्या या विजयात कर्णधार दासून शनाकाचा सिंहाचा वाटा आहे.

कर्णधार शनाकाने 25 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकामध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. शनाकाच्या अगोदर हा विक्रम इसुरू उदानाच्या नावावर होता. त्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 46 धावा केल्या होत्या. याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा माईक हसी आणि दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर-डुसेन संयुक्तपणे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. माईक हसीने 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि डुसेनने 9 जून 2022 रोजी शेवटच्या षटकामध्ये भारताविरुद्ध 45 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेचा कर्णधार शनाकाच्या शेवटच्या पाच टी-20 डावांवर नजर टाकल्यास त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याने गेल्या पाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 94.5 च्या सरासरीने आणि 187.12च्या स्ट्राईक रेटने 189 धावा केल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला यश मिळाले नाही. पहिल्या सामन्यात तो शून्य आणि दुसर्‍या सामन्यात 14 धावा करून बाद झाला होता. तिसर्‍या सामन्यात मात्र त्याने ऐतिहासिक खेळी केली. (AUS vs SL)

दरम्यान, मालिकेतील शेवटचा सामना जरी श्रीलंकेने जिंकला असला तरी मालिका मात्र ऑस्ट्रेलियाने आपल्या खिशात घातली आहे. तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशा फरकाने जिंकली.

Back to top button