IND vs SA : भारताला बरोबरीची संधी | पुढारी

IND vs SA : भारताला बरोबरीची संधी

कटक ; वृत्तसंस्था : विश्वचषकाच्या तयारीला लागलेला भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे रविवारी कटकच्या मैदानावर होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण, हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत 1-1 अशी बरोबरी करता येणार आहे.

आतापर्यंत कटकच्या मैदानात दोन ट्वेंटी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघ श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांबरोबर खेळला होता. भारताला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवता आला होता. या मैदानातील पहिला ट्वेंटी-20 सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झाला होता. हा सामना 2015 साली झाला होता आणि त्या सामन्याच्या निकालाचा या लढतीवर परिणाम होऊ शकतो. या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती आणि त्यांचा डाव फक्त 92 धावांवर आटोपला होता.

यावेळी भारताच्या सात फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. या सामन्यात रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी 22-22 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने भारताचे हे आव्हान 17.1 षटकांत पूर्ण केले होते. त्यामुळे या सामन्यातील आकडेवारी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नक्कीच आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा त्यांच्या संघाला होऊ शकतो. त्याचबरोबर भारतीय संघाचे लक्ष विचलित करणारी ही गोष्ट आहे.

भारतीय संघात दोन बदल

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात फलंदाजीत बदल होणार नाहीत, तर दोन्ही बदल हे गोलंदाजीमध्ये होतील, हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. दुसर्‍या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमरान मलिकला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्येही एक बदल होऊ शकतो आणि रवी बिश्नोई हा संघात येऊ शकतो. अक्षर पटेलची जागा त्याच्यासाठी रिकामी केली जाऊ शकते.

खेळपट्टीचा अंदाज

आतापर्यंत पाहिले तर कटकची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांनिशी उतरू शकतो. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Back to top button