ऋषभची चूक द्रवीडने टाळायला हवी होती : आशिष नेहरा
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय संघाला पहिल्याच ट्वेन्टी-20 सामन्यात पराभ पत्करावा लागला. या सामन्यात ऋषभ पंतकडून एक मोठी चूक घडली, त्याने चहलला सलग तिसरे षटक दिले नाही आणि त्याचा परिणाम सामन्यावर झाला. पण ही चूक प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टाळता आली असती, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने म्हटले आहे.
या सामन्यात मोक्याच्या क्षणी ऋषभ पंतने चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच भारताला पराभवाचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या षटकांत हर्षल पटेलने प्रिटोरियसला बाद करून फक्त एक धाव दिली. सामन्याच्या सातव्या षटकात अक्षर पटेलने सहा, तर आठव्या षटकात चहलने फक्त सहा धावा दिल्या होत्या.
त्यावेळी चहल व अक्षर पटेल हे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगले दडपण आणत होते. भारताला या सामन्यात कमबॅक करण्याची येथे संधी होती, पण ऋषभ पंतने चहलला पुढचे षटक दिले नाही. यानंतर चहलला थेट शेवटचे षटक देण्यात आले. चहलला जर त्यावेळी गोलंदाजी करण्याची संधी दिली असती तर दक्षिण आफ्रिकेवर दडपण वाढत गेले असते आणि त्याचा परिणाम सामन्यावर होऊ शकला असता.
नेहराने यावेळी सांगितले की, ऋषभ पंत हा युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्यामुळे जेव्हा कर्णधाराकडे जास्त अनुभव नसतो तेव्हा प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. जेव्हा पंतने चहलची गोलंदाजी थांबवली तेव्हा द्रविड पंतसाठी खास संदेश पाठवू शकला असता.

