बाबर आझम याने टाकले विराटला मागे | पुढारी

बाबर आझम याने टाकले विराटला मागे

मुल्तान ; वृत्तसंस्था : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने वन-डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1,000 धावा पूर्ण करण्याचा विराट कोहलीचा विक्रमही मोडला. विराटने 17 डावांमध्ये 1,000 धावा केल्या होत्या, तर बाबरला केवळ 13 डाव खेळावे लागले. त्याने वन-डे क्रिकेटमध्ये सरासरीच्या बाबतीतही विराटला मागे टाकले. बाबरची वन-डेतील सरासरी 60.31 अशी आहे.

पाकिस्तान संघाने पहिल्या वन-डे सामन्यात घरच्या मैदानावर बुधवारी वेस्ट इंडिजवर 5 विकेटस् व 4 चेंडू राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या 8 बाद 305 धावांचा पाकिस्तानने 49.2 षटकांत 5 बाद 306 धावा करून यशस्वी पाठलाग केला. विंडीजच्या शे होपच्या शतकाला बाबरने शतकी खेळी करून उत्तर दिले.

शे होपने 127 धावांची खेळी करताना विंडीजला त्रिशतकी मजल मारून दिली. वन-डेत कमी डावांत 4,000 धावा करणार्‍या फलंदाजांत होप संयुक्‍तपणे तिसर्‍या स्थानी आहे. हाशिम आमलाने सर्वात कमी 81 डावांत 4,000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर बाबर आझम (82), रिचर्ड (88) व होप (88) यांचा क्रमांक येतो. जो रूट (91) व विराट कोहली (93) चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. विंडीजकडून शामार्ह ब्रुक्सने 70, रोव्हमन पॉवेलने 32, रोमारिओ शेफर्डने 25 आणि कर्णधार निकोलस पूरनने 21 धावांचे योगदान दिले. हॅरिस रौफने सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या. शाहिन शाह आफ्रिदीने दोन, तर मोहम्मन नवाज व शादाब खान यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.

प्रत्युत्तरात बाबर आझम व इमाम उल हक यांनी दुसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. इमाम 65 धावांवर बाद झाल्यानंतर बाबर व मोहम्मद रिझवान यांनी दमदार खेळ केला. रिझवानने 59 धावा केल्या, तर त्यानंतर आलेल्या खुशदिल शाहने 23 चेंडूंत नाबाद 41 धावा चोपल्या.

बाबरने 107 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या आणि वन-डे क्रिकेटमधील हे त्याचे 17 वे शतक ठरले. त्याने सलग तिसर्‍या वन-डे सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दोनवेळा सलग तीन शतके झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. या सामन्यानंतर बाबरला ‘मॅन ऑफ दि मॅच’ पुरस्कार जाहीर झाला. परंतु, तो त्याने खुशदिल शाहला दिला. त्याची ही कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Back to top button