तीन दिवसांपूर्वी व्हिसासाठी भटकंती करणार्‍या अवनी लखेराने घेतला 2 सुवर्णपदकांचा वेध | पुढारी

तीन दिवसांपूर्वी व्हिसासाठी भटकंती करणार्‍या अवनी लखेराने घेतला 2 सुवर्णपदकांचा वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय खेळाडूंमध्ये टॅलेंटची कोणतीच कमतरता नाही. जर संधी मिळाली तर जगही जिंकू शकतात, हेच अवनी लखेराने सिद्ध करून दाखविले. तीन दिवसांपूर्वी व्हिसासाठी दिल्लीत भटकंती करणार्‍या अवनीने संधी मिळताच फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅराशूटिंग वर्ल्डकपमध्ये लागोपाठ दोन सुवर्णपदकांचा वेध घेतला.

बुधवारी सकाळी अवनी लखेरा व श्रीहर्ष देवा रेड्डी या जोडीने आर-4 मिक्सड 10 मीटर रायफल एसएच 2 मध्ये 253.1 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. अवनीचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने मंगळवारी 10 मीटर एअर रायफल प्रकारात 250.6 गुणांसह विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्णपदक पटकावले होते. याबरोबरच अवनी व श्रीहर्ष जोडीने 2024 मध्ये होणार्‍या पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळविले.

तीन दिवसांपूर्वी अवनी आपली आई श्वेता जेवरिया, प्रशिक्षक रॉकेश मनपत यांच्यासोबत व्हिसाच्या क्लिअरन्ससाठी भटकंती करत होती. यासंदर्भात अवनीने केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनाही विनंती केली होती. शेवटी क्रीडा मंत्रालयाने फ्रान्सला जाण्याची संधी प्राप्त करून देताच अवनीने कसर न सोडता 2 सुवर्णपदके पटकाविली. तिने टोकिओ 2020 च्या पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Back to top button