Mithali Raj Retirement : मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 23 वर्षांच्या संस्मरणीय कारकीर्दीला पूर्णविराम!

Mithali Raj Retirement : मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 23 वर्षांच्या संस्मरणीय कारकीर्दीला पूर्णविराम!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क :

भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज हिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तिने निवृत्तीचे संकेत दिले होते. मिताली गेली 23 वर्षे क्रिकेट खेळत होती, आता बुधवारी वयाच्या 39 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. मिताली राजला कौतुकाने महिला क्रिकेटची सचिन तेंडूलकर म्हटले जाते. (Mithali Raj Retirement)

मिताली राज भारतीय महिला संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. खरंतर ती भारतीय महिला क्रिकेटचा कणाच होती. मिताली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज आहे. तिने 232 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 50.68 च्या सरासरीने 7805 धावा केल्या. (Mithali Raj Retirement)

नुकत्याच झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मितालीने स्पर्धेतील सात सामन्यांत 26 च्या सरासरीने आणि 62.97 च्या स्ट्राईक रेटने 182 धावा केल्या. तिने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि त्यात तिने 68 धावा केल्या.

याशिवाय मितालीने 12 कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये तिने 19 डावात 43.68 च्या सरासरीने 699 तर, 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.52 च्या सरासरीने 2364 धावा केल्या आहेत. मितालीने वनडेत गोलंदाजी करताना आठ विकेट्स घेतल्या आहेत.

मिताली राजने दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या तिच्या क्रिकेट कारकिर्दीत पूर्णपणे राज्य केले. ती भारतातील महिला क्रिकेटची ओळख असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयही मितालीच्या नावावर आहेत. अशा परिस्थितीत तिने निवृत्ती घेणे ही महिला क्रिकेट विश्वातील मोठी घटना मानली जात आहे. (Mithali Raj Retirement)

निवृत्ती घेताना मिताली राज भावूक..

39 वर्षीय मिताली राजने आज (8 जून) ट्विटरवर एक दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली. मितालीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी परिधान करून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी आहेत. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. (Mithali Raj Retirement)

23 वर्षांची चमकदार कारकीर्द…

मिताली राजने 26 जून 1999 रोजी टीम इंडियासाठी पदार्पण केले. ती गेली 23 वर्षे भारतीय संघाकडून खेळत होती. 39 वर्षीय मितालीने टीम इंडियासाठी 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. ती 2000 साली भारतासाठी पहिला विश्वचषक खेळली. यानंतर 2005, 2009, 2013, 2017 आणि 2022 मध्येही मिताली टीम इंडियासाठी मैदानात उतरली. सर्वाधिक विश्वचषक खेळण्याच्या बाबतीत मितालीने न्यूझीलंडची माजी क्रिकेटपटू डेबी हॉकली आणि इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स यांना मागे टाकले. मितालीनंतर झुलन गोस्वामी ही भारतासाठी सर्वाधिक विश्वचषक खेळणारी खेळाडू आहे. तिने पाच विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे.

मिताली राज व्यतिरिक्त, सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सहा विश्वचषक खेळणारा एकमेव क्रिकेटर आहे. सचिनने 1992 ते 2011 पर्यंत भारतासाठी सहा विश्वचषक खेळले आणि शेवटचा विश्वचषक जिंकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news