सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजाला सुवर्णपदक | पुढारी

सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजाला सुवर्णपदक

पंचकुला ; क्रीडा प्रतिनिधी : महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे स्थान मिळाले आहे. मुलींनी मात्र कबड्डीत फायनल गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी दोन रौप्यपदके जिंकणार्‍या कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने वैयक्तिक 200 मी.मध्ये हे पदक जिंकले.

आज सायंकाळपर्यंत झालेल्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्राने 2 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्य अशी पदके पटकावली. सायकलिंगमध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदक मिळाले. जिम्नॅस्टिकमध्ये 1 रौप्य, 1 कांस्य, तर वेटलिफ्टिंगमध्ये 1 कांस्य, योगामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य पदक मिळाले. कुस्तीत 2 रौप्य व 1 ब्राँझ पदक जिंकले.

ट्रॅक सायकलिंगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा बबन दोनाळेने (कोल्हापूर) सुवर्ण पदक जिंकले. याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले. स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्य पदक जिंकले.

योगामध्ये आर्टिस्टिक ग्रुप प्रकारात जय कालेकर, प्रीत बोरकर, रूपेश सांगे, सुमित बंडाळे, ओम राजभरने रौप्य पदक जिंकले. मुलींमध्ये या प्रकारात मृणाल बानाईत, रूद्राक्षी भावे, स्वरा गुजर, तन्वी रेडीज, गीता शिंदे यांनी रौप्य पदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये राणी रानमाळे हिने 55 किलो वजनगटात 159 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले.

महाराष्ट्राच्या पोरी, कबड्डीत ‘लय भारी’

महाराष्ट्राच्या मुलींनी कबड्डीत आपणच ‘लय भारी’ असल्याचे दाखवून दिले. तामिळनाडूविरुद्ध झालेला सामना मुलींनी नेहमीप्रमाणे एकतर्फी (23 गुणांनी) जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामिळनाडूवर लोण चढवले. मुलांचा उत्तर प्रदेशविरुद्ध अटीतटीचा सामना झाला. परंतु अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

मुलींनी तामिळनाडूवर एकूण चार लोण चढवले. कर्णधार हरजितसिंग संधू, यशिका पुजारी, मनीषा राठोड आणि अनुजा शिंदे यांनी चढाईत गुणांची अक्षरशः लयलूट केली. उत्कृष्ट पकडी केल्याने तिकडूनही गुण मिळत गेले. पूर्वार्धात (पहिला हाफ) 18 विरुद्ध 13 असा गुणफलक होता. उत्तरार्धात (दुसरा हाफ) महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण वाढवले. त्यावेळी तामिळनाडूचे खेळाडू बोनस गुणांवर भर देत होते, परंतु ते त्यांना विजयासाठी कामी आले नाही. या सामन्यावर महाराष्ट्राने मजबूत पकड निर्माण केली होती. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या हाफमध्ये तीनवेळा तामिळनाडूला ऑलआऊट केले.

Back to top button