दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल स्टार ठरणार गेमचेंजर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल स्टार ठरणार गेमचेंजर

मुंबई : भारताचा संघ मायदेशात 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टेम्बा बवुमा याच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्ध आयपीएल 2022 गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या, सलामीवीर लोकेश राहुल, यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक तसेच मध्यमगती दुकली उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे पाच क्रिकेटपटू गेमचेंजर ठरतील.

हार्दिक पंड्या

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अष्टपैलू खेळासह नेतृत्वामध्ये छाप पाडणार्‍या हार्दिक पंड्याने सर्वांची मने जिंकलीत. 487 धावा आणि 8 विकेटस् घेत त्याने क्रिकेटपटू म्हणून दमदार पुनरागमन केलेच. शिवाय, त्याच्यातील कुशल नेतृत्वगुणांचा करिष्मा पाहायला मिळाला. हार्दिकने पदार्पणात गुजरातला जेतेपद पटकावून दिले.

लोकेश राहुल

सलामीवीर लोकेश राहुलची बॅट चांगलीच तळपली. तरीही त्याला त्याच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. राहुलने 51.33 च्या सरासरीने 616 धावा फटकावल्या. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्यावर आघाडी फळीची भिस्त आहे.

दिनेश कार्तिक

डीके म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सचे प्रतिनिधित्व करताना 55च्या सरासरीने 330 धावा करताना फिनिशरची चोख भूमिका बजावली. दमदार फलंदाजीमुळे 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन'चा पुरस्कार पटकावणार्‍या या बॅटरला जवळपास तीन वर्षांनंतर भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले.

उमरान मलिक

सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 'पेस मशिन' म्हणून नावारूपास आलेल्या उमरान मलिकने अपेक्षेप्रमाणे सिलेक्टर्सना त्याची दखल घ्यायला लावली. जम्मू आणि काश्मीरच्या या युवा खेळाडूने पदार्पणातील हंगामात 14 सामने खेळताना 22 विकेटस् टिपल्या. त्याने 150 प्रतितास वेगाने चेंडू टाकताना सर्वांकडून वाहवा मिळवली. साखळी फेरीत गुजरात टायटन्सविरुद्ध 25 धावांमध्ये घेतलेल्या 5 विकेटस् ही आयपीएलमधील आजवरची सर्वोत्कृष्ट बॉलिंग ठरली आहे.

अर्शदीप सिंग 

उमरान मलिकसह 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने छाप पाडली आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना 14 सामन्यांत त्याला 10 विकेटस् मिळवता आल्या तरी त्याचा इकॉनॉमी रेट (7.70) लक्ष वेधून घेतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news