फ्रेंच ओपन : कोको गॉफ अंतिम फेरीत | पुढारी

फ्रेंच ओपन : कोको गॉफ अंतिम फेरीत

पॅरिस ; वृत्तसंस्था : अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अवघ्या 18 वर्षांची असलेली कोको आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वेयतेकशी विजेतेपदासाठी झुंज देणार आहे.

कोकोने उपांत्य फेरीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1 असा पराभव केला. हा सामना एक तास 28 मिनिटे चालला. 18 वर्षांच्या कालावधीनंतर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोको सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2004 मध्ये रशियाची मारिया शारापोव्हा अंतिम सामन्यात खेळणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली होती.

कोको गॉफ सध्या जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलेले नाही. अशा स्थितीत आता ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूशी झुंजणार आहे. 13 मार्च 2004 रोजी अटलांटा येथे जन्मलेल्या कोकोला खेळाची पार्श्वभूमी आहे. तिचे वडील बास्केटबॉल खेळाडू, तर आई अ‍ॅथलिट आहे. कोकोलादेखील लहानपणापासून खेळाची आवड होती. भविष्यात तिने टेनिसची निवड केली. दिग्गज अमेरिकन टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स या तिच्या आदर्श आहेत. कोकोला या दोन्ही महिला टेनिसपटूंकडून प्रेरणा मिळाली आहे.

 

Back to top button