South Africa vs India : कटकचा सामना रद्द होणार? | पुढारी

South Africa vs India : कटकचा सामना रद्द होणार?

मुंबई ; वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या ट्वेंटी-20 सामन्याबाबत आता संदिग्धता निर्माण झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना हा कटक येथील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे; पण या सामन्याबाबत आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सामना रद्द होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. या स्टेडियममध्ये अग्निरोधक सुविधा नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

ओडिशा येथील उच्च न्यायालयात बाराबती स्टेडियमबाबत एक याचिका दाखल केली आहे. ही याचिका ओडिशामधील संजय नायक यांनी दाखल केली आहे. संजय यांनी या याचिकेमध्ये बाराबती स्टेडियममध्ये होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेत संजय यांनी दावा केला आहे की, बाराबती स्टेडियममध्ये काही अत्यावश्यक सेवाच नाही. खासकरून या स्टेडियममध्ये आगीचा सामना करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी संजय यांनी न्यायालयाकडे केली आहे. संजय यांनी ओडिशा क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

ओडिशाच्या उच्च न्यायालयाने 26 मे या दिवशी स्थानिक क्रिकेट संघटनेला एक आदेश दिला होता. या आदेशामध्ये बाराबती स्टेडियमवर आग प्रतिबंधक सुरक्षा सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते; पण अजूनही या सुविधांची व्यवस्था क्रिकेट संघटनेने अद्याप केलेली नाही, असे संजय यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे जर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही क्रिकेट संघटनेने या गोष्टी केल्या नसतील, तर सामना कसा खेळवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णयही होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जर सामना रद्द करावा लागला, तर बीसीसीआयसाठी हा मोठा धक्का असेल; कारण आतापर्यंत या कारणासाठी सामने रद्द करण्याची वेळ बीसीसीआयवर आलेली नाही.

Back to top button