अवंतिका नराळे : प्लंबरची मुलगी सोनेरी झेप घेण्यास सज्ज | पुढारी

अवंतिका नराळे : प्लंबरची मुलगी सोनेरी झेप घेण्यास सज्ज

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अवंतिका नराळे हिची हरियाणातील पंचकुला येथे होणार्‍या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली असून, या वेगवान शर्यतीत सुवर्णपदक पटकावण्याची तिची इच्छा आहे.

प्लंबरची मुलगी असलेल्या अवंतिकाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. तिने 2018 मध्ये दुती चंदचा 200 मीटर ज्युनियर राष्ट्रीय विक्रम मोडला तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती. या कामगिरीमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने आता हरियाणातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्णपदकावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मी खूप मेहनत घेऊन प्रशिक्षण घेत आहे आणि हरियाणात एक किंवा दोन सुवर्ण जिंकण्याचा मला विश्‍वास आहे, ती म्हणाली.

अवंतिकाचा शिखरावर जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. तिच्या आईने तिच्या मोलकरीण म्हणून काम करून प्लंबर पतीच्या कमाईस हातभार लावला. त्यांनी अवंतिकाच्या स्वप्नात कधीही आडकाठी येऊ दिले नाही.

अवंतिका नराळे खेलो इंडिया प्लॅटफॉर्मवर नवीन नाही. 2019 च्या पुण्यातील 100 मीटर शर्यतीमध्ये ती चुकली, स्टार्ट गन ऐकू न आल्याने तिची सुरुवात उशिरा झाली. मात्र तिने 200 मीटर सुवर्णपदक जिंकून तोटा भरून काढला. 2019 मध्ये, अवंतिकाने आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 100 मीटर सुवर्णपदक (11.97 सेकंद) हाँगकाँगमध्ये जिंकून सर्वोच्च स्तरावर आपली क्षमता दाखवली. तिने 200 मीटरमध्ये 24.20 सेकंदात पूर्ण करून रौप्यपदक जिंकले, जे तिच्या कनिष्ठ राष्ट्रीय विक्रमाप्रमाणेच आहे. तिने मेडले रिलेमध्येही रौप्यपदक जिंकले.

पुण्यातील कोथरूड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या अवंतिकाचे पहिले प्रेम कबड्डी होते, पण अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक संजय पाटणकर यांनी स्प्रिंटमधील तिची प्रतिभा पाहिली आणि तिला गती देत स्टार बनवले.

Back to top button