..तर लोक पंतला विसरून जातील : वीरेंद्र सेहवाग | पुढारी

..तर लोक पंतला विसरून जातील : वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने स्वत:ला वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये मर्यादित न ठेवता कसोटी क्रिकेटमध्येही स्वत:चे स्थान निर्माण केले पाहिजे; अन्यथा तो लोकांच्या विस्मृतीत जाईल, असे विधान भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने केले आहे. ऋषभ पंतने 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले पाहिजेत, असे सेहवागचे म्हणणे आहे.

सेहवागने केलेल्या खळबळजनक विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंत जर भारताच्या ‘कसोटी’ 11 खेळाडूंच्या यादीत आपली जागा निश्‍चित करू शकला नाही तर देशातील लोकांच्या तो जास्त काळ लक्षात राहणार नाही, असे सेहवाग म्हणतो आहे. एका स्पोर्टस् चॅनेलच्या ‘होम ऑफ हिरोज’ नावाच्या कार्यक्रमात सेहवागने हे मत व्यक्‍त केले.

लोकांनी आपले नाव विसरून जाऊ नये असे जर ऋषभ पंतला वाटत असेल तर त्याने आता व्हाईट बॉल क्रिकेटमधून बाहेर येऊन जरा रेड बॉल क्रिकेटकडे म्हणजेच कसोटी क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायला हवे. जर तो कसोटी क्रिकेट जास्त खेळला नाही, तर त्याला लोक विसरून जातील, असे सेहवाग म्हणाला.

100 हून अधिक कसोटी सामने खेळले पाहिजेत

ऋषभ पंत 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळला तरच त्याचे नाव भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवले जाईल. आतापर्यंत केवळ 11 क्रिकेटपटू असे आहेत की ज्यांनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि कोणताही क्रिकेट चाहता त्या 11 खेळाडूंची नावे आजही तुम्हाला सांगू शकेल, असे सेहवाग म्हणाला. आयपीएल खेळणार्‍या खेळाडूंपैकी जवळपास सर्वच युवा क्रिकेटपटूंना नक्‍कीच असे वाटत असेल की त्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये खेळावे, असेही तो म्हणाला.

कोहलीचे दिले उदाहरण

वीरेंद्र सेहवागने यावेळी विराट कोहलीचाही उल्लेख केला. आपण 100-150 किंवा 200 कसोटी सामने खेळलो तरच आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले जाईल याची जाणीव विराट कोहलीला देखील आहे. त्यामुळेच त्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याकडे जास्त भर असतो, असे सेहवाग म्हणाला. भारतीय क्रिकेटमध्ये एक दशकाहून अधिक काळ क्रिकेट खेळलेल्या सेहवागने आपल्या करिअरमध्ये 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. तर वन-डे क्रिकेटमध्ये 35.05 सरासरीने 8273 धावा केल्या आहेत.

माझ्या मतानुसार कसोटी क्रिकेट सर्वोत्तम क्रिकेट आहे. मला आजवर अनेकांनी सांगितलं की पहिला चेंडू सांभाळून खेळावा त्यात अगदी सचिन तेंडुलकर यांचाही समावेश होता, पण मी कधीच असे केले नाही. पहिला चेंडू मी वॉर्मअप चेंडूसारखा खेळायचो, असेही सेहवाग म्हणाला.

Back to top button