Rafael Nadal 300 : राफेल नदालच्या ग्रँडस्लॅम विजयाचे ‘त्रिशतक’ | पुढारी

Rafael Nadal 300 : राफेल नदालच्या ग्रँडस्लॅम विजयाचे ‘त्रिशतक’

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक टेनिस क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालची (Rafael Nadal) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा जादू पहायला मिळाली. त्याने फ्रान्सच्या कोरेंटिन माउटेचा पराभव करून 300 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकून इतिहास रचला. या विजयासह नदालने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. नदालने माउटेला 6-3, 6-1, 6-4 अशा सरळ तीन सेटमध्ये मात दिली.

स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) आतापर्यंत 13 वेळा फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ही स्पर्धा 14 व्यांदा जिंकण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. त्यातच त्याने बुधवारी रात्री उशीरा झालेल्या सामन्यात आपला ग्रँडस्लॅम करिअरमधील 300 वा सामना जिंकून रॉजर फेडरर नोवाक जोकोविच या दिग्गजांच्या यादीत प्रवेश आपल्या नावाची नोंद केली आहे.

विक्रमी 21 वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा नदाल (Rafael Nadal) 300 ग्रँडस्लॅम सामने जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रॉजर फेडररने 369 आणि नोव्हाक जोकोविचने 324 ग्रँडस्लॅम सामने जिंकले आहेत. 300 वा सामना जिंकल्यानंतर नदाल भावूक झाला. ‘गेले दोन महिने माझ्यासाठी अडचणींचे गेले. पण हंगामाची सुरुवात छान, अविस्मरणीय आणि खूप भावूक झाल्याचे त्याने मनोगत व्यक्त केले.

Back to top button