चेतेश्वर पुजारा याचे भारतीय संघात पुनरागमन | पुढारी

चेतेश्वर पुजारा याचे भारतीय संघात पुनरागमन

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धचा गेल्या वर्षी स्थगित झालेला कसोटी सामना जून महिन्यात खेळवण्यात येणार असून या संघासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली. तसेच आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला.

इंडियन प्रीमिअर लीग 2022 नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका आटोपून आयर्लंड व इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहेत. 1 ते 5 जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंग्लंड दौर्‍यावरील पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती आणि ती कसोटी यंदा होणार आहे. भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली यांना बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली आहे. त्यामुळे ते इंग्लंड दौर्‍यावर दमदार कामगिरी करण्यासाठी ताजे तवाने असणार आहेत. अजिंक्य रहाणेला दुखापतीमुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याची निवड या कसोटीसाठी झालेली नाही. चेतेश्वर पुजारा याने मात्र या कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराने 4 सामन्यांत दोन द्विशतके व दोन शतकांसह 143.40च्या सरासरीने 717 धावा चोपल्या आणि त्यामुळे त्याची संघात निवड झाली आयपीएलचे यंदाचे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे.

येत्या 29 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. आज राष्ट्रीय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-20 मालिकेसाठी 17 सदस्यीय घोषणा केली आहे. तर इंग्लंडविरोधातील पुनर्निर्धारित कसोटी सामन्यासाठी 17 सदस्यीय संघ घोषित केला आहे.

येत्या 9 जून ते 19 जून या कालावधित भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. तसेच येत्या 1 ते 5 जुलै दरम्यान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरोधात पुनर्निर्धारित पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारत सध्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

भारताचा कसोटी संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा.

भारताचा टी-20 मालिकेसाठी संघ :

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

 

 

 

Back to top button