LSG vs RR : राजस्थान प्ले ऑफच्या दिशेने, लखनौला मागे टाकले

LSG vs RR : राजस्थान प्ले ऑफच्या दिशेने, लखनौला मागे टाकले
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : राजस्थानने रविवारी लखनौवर (LSG vs RR) रॉयल विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. आता तेरा सामन्यांतून त्यांच्या खात्यात 16 गुण झाले असून गुणतालिकेत त्यांनी लखनौला मागे टाकून दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील चमूने हा सामना 24 धावांनी जिंकला. लखनौचेही 16 गुण आहेत. तथापि, सरस धावगतीच्या (नेट रनरेट) आधारे राजस्थानने लखनौला मागे टाकले आहे.

विजयासाठी 179 धावांचे आव्हान समोर ठेवून मैदानात उतरलेल्या लखनौला 20 षटकांत 8 गडी गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. या संघाला सुरुवातीलाच ट्रेंट बोल्टने हादरवले. त्याने लागोपाठच्या चेंडूंवर क्विटंन डी कॉक आणि आयुष बदोनी यांना तंबूत पाठवले. डी कॉकने 7 धावा केल्या, तर बदोनीला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार लोकेश राहुल केवळ 10 धावा करून प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यशस्वी जैस्वालने त्याचा झेल टिपला. तसेच डी कॉकचा झेल जेम्स नीशामने पकडला.

बदोनी गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. राहुल बाद झाला तेव्हा फलकावर 29 धावा लागल्या होत्या. त्यानंतर दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या यांनी 46 चेंडूंत 65 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले. ही जोडी घातक सिद्ध होणार असे वाटत असतानाच रविचंद्रन अश्‍विनने कृणालला बाद केले. सीमारेषेवर त्याचा झेल ट्रेंट बोल्ट आणि रियान पराग यांनी संयुक्‍तरीत्या टिपला. पंड्याने 25 धावा केल्या. (LSG vs RR)

हुड्डाने एक बाजू छान लावून धरली होती. त्याला साथ देण्यासाठी मार्कुस स्टॉयनिस मैदानात उतरला. दरम्यान, युजवेंद्र चहलने हुड्डाला बाद केले व तिथपासून लखनौच्या दुर्गतीला सुरुवात झाली. हुड्डाने 59 धावांची सुरेख खेळी केली. त्यानंतरचा खेळ म्हणजे औपचारिकता ठरला. राजस्थानकडून बोल्ट, ओबेद मकॉय व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 तर चहल आणि रविचंद्रन अश्‍विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

त्यापूर्वी राजस्थाननने 6 बाद 178 धावा चोपल्या. त्यांचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकराली. हा निर्णय चुकीचा ठरला नाही. पूर्ण बहरात असलेला सलामीवीर जोस बटलर जरी 2 धावांवर आवेश खानचा बळी ठरला तरी यशस्वी जैस्वाल आणि स्वतः सॅमसन यांनी सुरेख फलंदाजी केली. जैस्वालने 41 धावांची खेळी केली. त्याला आयुष बदोनीने स्वतःच्याच मार्‍यावर टिपले.

जैस्वालने 29 चेंडूंचा सामना करून अर्धा डझन चौकार ठोकले आणि एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. सॅमसनने चमकदार 32 धावा चोपल्या त्या सहा चौकारांच्या मदतीने. त्याने 24 चेंडूंचा सामना केला. नेहमीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला मधल्या फळीत खेळवण्यात आले. त्याने केवळ 18 चेंडूंत 39 धावा कुटल्या. 5 सणसणीत चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांद्वारे त्याने आपली खेळी सजवली. पडिक्कलला रवी बिश्‍नोईने बाद केले. सीमारेषेवर दीपक हुड्डाने त्याचा झेल छान टिपला.

त्यानंतर जिमी नीशाम आणि रियान पराग यांनी आघाडी सांभाळली. परागने एका षटकारासह 19 धावा केल्या त्या 16 चेंडूंत. रवी बिश्‍नोई याने स्टॉयनिसकरवी त्याला झेलबाद केले. त्यानंतर एका चुकीच्या कॉलमुळे जिमी नीशाम याला धावबाद व्हावे लागले. त्याने 14 धावांचे योगदान दिले. राजस्थानला नीशामच्या रूपाने सहावा धक्का बसला. त्यानंतर रविचंद्रन अश्‍विनने नाबाद 10 तर ट्रेंट बोल्टने 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 17 धावा केल्या त्या 9 चेंडूंत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news