CSK Vs GT : गुजरातचे विजयी ‘दशक’, गुणसंख्या २० वर | पुढारी

CSK Vs GT : गुजरातचे विजयी ‘दशक’, गुणसंख्या २० वर

मुंबई ; वृत्तसंस्था : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने रविवारी चेन्‍नई (CSK Vs GT) किंग्जवर 7 गडी आणि 5 चेंडू राखून सुपर विजय संपादला. त्याचबरोबर त्यांनी आपली गुणसंख्या 20 वर नेली. गुजरातने अशा प्रकारे दहाव्यांदा जय हो केले आहे. नाबाद 67 धावांची खेळी केलेला सलामीवीर तथा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या गुजरातने अपेक्षेनुसार केवळ 3 गडी गमावून 19.1 षटकांतच विजयाला गवसणी घातली. त्यांनी 137 धावा केल्या. सलामीवीर तथा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने 57 चेंडूंचा सामना करून 67 धावा कुटल्या. 8 चौकार व 1 षटकार हे त्याचे मुख्य फटके ठरले. दुसरा सलामीवीर शुभमन गिल याने 18 तर मॅथ्यू वेड याने 20 धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्या केवळ 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर साहा याने डेव्हिड मिलरच्या साथीत गुजरातचा विजय आरामात साकारला. चेन्‍नईला रविवारी नवव्यांदा पराभवाचा झटका बसला.

सध्या गुजरातचा संघ पूर्ण बहरात असल्यामुळे चेन्‍नईने आणखी मोठी धावसंख्या केली असती तरी त्याचा उपयोग झाला नसता. मुळातच धावसंख्या छोटी असल्यामुळे चेन्‍नईच्या गोलंदाजांनाही फार काही करण्याची संधी नव्हती. उपचार म्हणूनच त्यांना हा सामना खेळायचा होता व त्यातदेखील त्यांनी कसलीही जिगर दाखवली नाही. माहिशा पथिराना याने चेन्‍नईकडून दोन तर मोईन अली याने एक गडी बाद केला. गुजरातने सुरुवातीपासून या सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. (CSK Vs GT)

त्यापूर्वी चेन्‍नईने प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शानदार अर्धशतक (51) ठोकले. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 1 षटकार खेचला. नारायण जगदीशन याने 39 धावांची चमकदार खेळी केली. त्याने 33 चेंडू खेळून 3 चौकार व 1 षटकार लगावला. अष्टपैलू मोईन अलीने 21 धावा केल्या.

डेव्हॉन कॉन्वे सुरुवातीला केवळ 5 धावा करून तंबूत परतला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी केवळ 7 धावा करून तंबूत परतला, तर शिवम दुबे याला भोपळाही फोडता आला नाही. 12 मे रोजी मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्‍नईचा सगळा संघ अवघ्या 97 धावांत गारद झाला होता. त्या तुलनेत रविवारी चेन्‍नईने बर्‍यापैकी धावसंंख्या उभारली एवढेच म्हणता येईल. एरवी चेन्‍नईचे आव्हान या स्पर्धेतून आधीच आटोपले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही.

गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्‍नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. प्रामुख्याने अनुभवी मोहम्मद शमी याने अचूक टप्प्यावर मारा करून चेन्‍नईच्या फलंदाजीला वेसण घातली. त्याने 4 षटकांत फक्‍त 19 धावा मोजून दोन मोहरे टिपले. कर्णधार हार्दिक पंड्या यानेही दोन षटके गोलंदाजी करून 8 धावा दिल्या. राशिद खानने 34 धावा मोजून 1 बळी मिळवला. तसेच अल्झारी जोसेफ याने 3 षटकांत 15 धावा देऊन 1 गडी तंबूत पाठवला. रविश्रीनिवासन साई किशोर याने 4 षटकांत 31 धावा देऊन 1 गडी बाद केला. यश दयाळने 3 षटकांत 27 धावा मोजल्या. या सर्व गोलंदाजांनी सुरेख मारा केल्यामुळे चेन्‍नईच्या फलंदाजांना फटकेबाजी करायला मोकळीक मिळाली नाही.

सायमंडस्ला आदरांजली

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंडस् याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात रविवारी दोन्ही संघाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडूनही सायमंडस्ला आदरांजली अर्पण करण्यात आली. एवढेच नव्हे तर चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामना सुरू होण्याआधीदेखील सायमंडस्ला श्रद्धांजली वाहण्यात आली.

Back to top button