नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: क्रिकेटचं मैदान गाजवून झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना आता साहित्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुरेश रैनाचे 'बिलिव्ह : वॉट लाइफ अॅण्ड क्रिकेट थॉट मी' हे आत्मचरित्र साेमवारी प्रकाशित झाले. या पुस्तकात अनेक रंजक किस्से वाचायला मिळणार आहेत. दरम्यान, यातील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर होत आहे.
रैनाने 'बिलिव्ह : वॉट लाइफ अॅण्ड क्रिकेट थॉट मी' अनेक खुलासे केले आहेत. धोनी, राहुल द्रविड, गांगुली यासारख्या अनेक गोष्टींवर रैनाने यापूर्वी कधीही थेटपणे न मांडलेली मते या पुस्तकातून व्यक्त केली असल्याचे वाचायला मिळत आहे. तसेच, इतरही अनेक रंजक किस्से सुद्धा आपल्या चाहत्यांसमोर मांडलेत. त्यातीलच एक किस्सा म्हणजे आक्षेपार्ह असा मजकूर असणारं टी-शर्ट परिधान केल्यासंदर्भातला…
रैना सांगतो, एका परदेश दौऱ्यादरम्यान मी F**K असा आक्षेपार्ह मजकूर असणारा टी-शर्ट घातला होता. त्यावरुन राहुल द्रविडने मला चांगलेच सुनावले होते. "तुला समजतंय का तू घातलेल्या शर्टावर काय लिहिलं आहे? तू हे शर्ट घालून फिरतोयस. तू एक भारतीय क्रिकेटपटू आहेस हे लक्षात ठेव," अशा कडक शब्दांमध्ये द्रविड यांनी माझी कानउघाडणी केल्याचे रैनाने म्हटले हाेते.
द्रविडचे हे बोल ऐकताच मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. द्रविडसारख्या खेळाडूने शर्टावरील मजकुरावर आक्षेप घेतल्याने मी तातडीने टॉयलेटमध्ये जाऊन तो टी शर्ट कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकला असल्याचे रैनाने पुस्तकात म्हटले आहे. रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात राहुल द्रविड संघाचा कर्णधार असतानाच केली होती.