IPL 2022 : दिग्गज खेळाडूंची बॅट थंडच! | पुढारी

IPL 2022 : दिग्गज खेळाडूंची बॅट थंडच!

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) जवळपास निम्मे सामने संपले असले तरी कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केेलेल्या दिग्गज खेळाडूंची बॅट अजूनही थंड असल्यामुळे चाहत्यांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार कायरान पोलार्ड यंदाच्या हंगामात अगदीच टुकार कामगिरी करताना दिसतोय. फलंदाजी-गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत त्याला दारूण अपयश आले आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. सलग 8 सामने पराभूत झाल्यामुळे ते गुणतालिकेत तळाला आहेत. या सर्व सामन्यांत पोलार्डने केवळ 125 धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जची कामगिरीदेखील यंदा अत्यंत सुमार असून, त्यांनीही 6 सामने गमावले आहेत. यावेळी संघाचे कर्णधारपद मागील सामन्यात पुन्हा महेंद्रसिंग धोनीने स्वीकारले असले तरी त्याआधी ही जबाबदारी जडेजाकडे होती. मात्र, त्याने कर्णधार म्हणूनच नव्हे तर खेळाडू म्हणूनही सामान्य कामगिरी केली. त्याने 9 सामन्यांत केवळ 113 धावा केल्या आणि कसेबसे 6 बळी मिळवले आहेत.

लखनौ सुपर जायंटस्चा संघ कमाल कामगिरी करत असला तरी त्यांचा मनीष पांडे मात्र खराब कामगिरी करत आहे. त्याने 9 सामन्यांत केवळ 88 धावा केल्या असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे 38. पांडेचा स्ट्राईक रेट 110 इतकाच आहे. पंजाब किंग्जने मोठी किंमत मोजून संघात घेतलेल्या जॉनी बेअरस्टोनेदेखील यंदा सुमार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 7 सामन्यांत केवळ 80 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे अवघी 32. (IPL 2022)

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही यंदा शांत दिसत असून, त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पंतने 9 सामन्यांत 234 धावा केल्या असून, यावेळी पंतचा स्ट्राईक रेट 149.04 इतकाच राहिला आहे. पंतची सर्वोच्च धावसंख्या आहे केवळ 44.

Back to top button