BCCI चा ‘या’ क्रीडा पत्रकाराला दणका! घातली दोन वर्षांची बंदी

BCCI चा ‘या’ क्रीडा पत्रकाराला दणका! घातली दोन वर्षांची बंदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकावण्याचा प्रयत्न करणारे क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे मजुमदार हे पुढील दोन वर्षे कोणत्याही देशांतर्गत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा भाग असणार नाहीत. तसेच बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) खास मॅसेज दिला आहे. बंदी घालण्यात आलेल्या मजुमदार या क्रीडा पत्रकाराला आयसीसीच्या कार्यक्रमांमध्ये स्टेडियममध्ये प्रवेश मिळू नये असे बीसीसीआयने कळवले आहे.

रिद्धिमान साहा याला धमकावल्याबद्दल बीसीसीआयने पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा आदेश जारी केल्याची पुष्टी वृत्तसंस्था एएनआयने केली आहे.

काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा आणि गुजरात टायटन्सचा खेळाडू रिद्धिमान साहाने पत्रकार बोरिया मजुमदारवर ऑनलाइन गुंडगिरीचा आरोप केला होता. साहाने 23 फेब्रुवारी रोजी अज्ञात पत्रकारा (जो नंतर बोरिया मजुमदार असल्याचे उघड झाले) विरुद्ध अनेक ट्विट केले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये पत्रकाराने चॅटच्या माध्यमातून मला कसे धमकावले हे सांगितले. त्याने चॅटींगचे स्क्रीन शॉट्सही शेअर केले. यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली. खरे तर साहाने मजुमदार यांना मुलाखत देण्यास नकार दिला होता, त्यावर मजुमदार यांनी साहा यांना ऑनलाईन धमकी दिली होती. (BCCI)

क्रीडा पत्रकार मजुमदार यांनी साहाला धमकी दिली होती की ते साहाची कारकीर्द संपवू शकतात. मात्र, साहाच्या आरोपांनंतर बचाव करताना बोरिया मजुमदार यांनी एक व्हिडीओ जारी करून आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते. (BCCI)

फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत स्थान न मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाने निवडक मीडिया हाऊसला मुलाखती दिल्या. त्यानंतर तो सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिला. दरम्यान, त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून व्हॉट्सअॅप चॅटचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ज्यामध्ये लिहिले होते, 'तू फोन केला नाहीस. मी यापुढे तुझी मुलाखत घेणार नाही. मी अपमान मनात साठवून ठेवतो. हे तुझे कृत्य मी लक्षात ठेवेन', असे मॅसेज मजुमदार यांनी सहाला पाठवले होते.

दरम्यान, साहाच्या बाजूने अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपले मत व्यक्त केले. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनी सहाच्या समर्थनार्थ ट्विट करत बीसीसीआयकडे त्या क्रीडा पत्रकारावर बंदी घालण्याची मागणी केली होती. साहाच्या या आरोपानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभातेज भाटिया यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. या तिघांच्या तपासात मजुमदार यांनी साहाला मुलाखतीसाठी धमकावले होते हे सिद्ध झाले. त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. आज (दि. ४) अखेर बीसीसीआयने मजुमदारवर दोन वर्षांची बंदी घातल्याचे जाहीर केले.

मजुमदार यांच्यावर घातलेल्या बंदीमध्ये तीन शिक्षा समाविष्ट आहेत. पहिली, बोरियाला भारतातील प्रेसचे सदस्य म्हणून मान्यता दिली जाणार नाही. दुसरी, बोरिया मजुमदार कोणत्याही नोंदणीकृत खेळाडूची मुलाखत घेऊ शकणार नाहीत. आणि तिसरी शिक्षा आहे की, बीसीसीआयचे स्वामित्व असलेल्या कोणत्याही क्रिकेट असोसिएशनच्या सुविधांला लाभ बोरिया यांना मिळणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news