

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॉर्मन प्रिचर्ड या ब्रिटीश नागरिकाने भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. १९०० साली पॅरीस येथे झालेल्या दुस-या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ही किमया केली.
ऑलिम्पिक खेळ सुरू होऊन १३४ वर्षे झाली आहेत. अथेन्सपासून सुरू झालेला आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा प्रवास टोकियोला पोहोचला आहे. या खेळांमध्ये भारताचा प्रवास १९०० मध्ये सुरू झाला.
त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता. ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होत. ब्रिटिश सैन्याने भारतीयांना स्वतःपेक्षा खूप खाली मानले. हेच कारण होते की जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी आली तेव्हा त्यांनी ब्रिटनच्या नॉर्मन गिल्बर्ट प्रिचर्ड यांची निवड केली.
१९०० मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून सहभागी होणारे ते एकमेव खेळाडू होते. या ऑलिम्पिकमधून त्यांच्याबरोबर भारताच्या पदकाचा प्रवासही सुरू झाला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी २०० मीटर अडथळा आणि २०० मीटर डॅश स्पर्धेत प्रत्येकी १-१ रौप्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारे ते पहिले आशियाई वंशाचे खेळाडू ठरले (कारण त्यांचा जन्म भारतात झाला होता).
पॅरिस गेम्समध्ये त्यांनी पाच स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यातील तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. ६० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ११० मीटर हर्डल रेस आणि २०० मीटर हर्डल रेस या पाच अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये प्रीचार्डने सहभाग नोंदवला.
नॉर्मन गिल्बर्ट प्रीचार्ड हे ब्रिटिश नागरिक होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८७५ रोजी कोलकाताच्या अलिपूर येथे झाला. वडील जॉर्ज पीटरसन प्रीचार्ड हे लेखापाल होते. त्यांच्या आईचे नाव हेलन मेनार्ड प्रीचार्ड होते.
प्रिचार्ड यांनी कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शहरातील एका नामांकित बर्ड अँड कंपनीमध्ये ते नोकरी करू लागले.
प्रसिद्ध इंग्रजी इतिहासकार कीथ मॉर्बी यांनी याची पुष्टी केली. ज्यांनी २००० च्या सुरुवातीला लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीच्या इंडिया ऑफिस रेकॉर्ड विभागात नॉर्मन यांचे रेकॉर्ड तपासून खुलासा केला.
तथापि, ऑलिम्पिक इतिहासकार इयान बुकानन यांच्या मते, नॉर्मन प्रीचार्डने भारतीय ध्वजाखाली नाही तर एक व्यक्ती म्हणून ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांना भारतीय खेळाडू मानते आणि त्याच्या दोन्ही ऑलिम्पिक पदकांचे श्रेय भारताला देते.
प्रिचर्ड एक नैसर्गिक खेळाडू होते. ते केवळ एक धावपटू नव्हते तर त्यांना फुटबॉल खेळण्याचीही आवड होती. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बंगालला १८९४ ते १९०० दरम्यान सलग सात वर्षे १०० यार्ड शर्यतीत सलग विजय मिळवून दिला.