MS Dhoni CSK Captain : धोनी पुन्हा चेन्नईचा ‘कॅप्टन’, रवींद्र जडेजाचा राजीनामा! | पुढारी

MS Dhoni CSK Captain : धोनी पुन्हा चेन्नईचा ‘कॅप्टन’, रवींद्र जडेजाचा राजीनामा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने शनिवारी (३० एप्रिल) आपल्या पदाचा राजीनामा दिला. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपद सोडलेला महेंद्रसिंग धोनी पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. जडेजाला कर्णधारपदाचे दडपण सांभाळता आले नाही. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले. चेन्नई संघाने चालू हंगामात आतापर्यंत केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आठ सामन्यांत सहा पराभवांसह संघ नवव्या स्थानावर आहे.

रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी कर्णधार म्हणून खेळणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये चार वेळा विजेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 121 सामने जिंकले.

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे- जडेजाने खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. धोनीने संघाच्या हितासाठी ते मान्य केले आहे.

जडेजाने चालू मोसमात 92 चेंडूंचा सामना करत 112 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 121.7 आहे. गोलंदाजीतही जडेजा काही कमाल दाखवू शकला नाही. त्याने 8.19 च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट घेतल्या.

Back to top button