LSGvsMI : मुंबई इंडियन्सचा सलग 8वा पराभव, लखनौ 36 धावांनी विजयी

LSGvsMI : मुंबई इंडियन्सचा सलग 8वा पराभव, लखनौ 36 धावांनी विजयी
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : लोकेश राहुलची कर्णधाराची खेळी आणि सर्वच गोलंदाजांचा धारदार मारा यांच्या बळावर लखनौने (LSGvsMI) रविवारी मुंबई इंडियन्सला 36 धावांनी धूळ चारली. मुंबईने अशा प्रकारे आपल्या पराभवांची अष्टमी पूर्ण केली. त्यांची पाटी कोरीच आहे. पाच विजय संपादलेल्या लखनौचे आता आठ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत.

नाणेफेक जिंकलेल्या लखनौने मुंबईपुढे विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते त्यांना पेलवले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी 49 धावांची सलामी दिली. किशनने 8 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविस हाही 3 धावा करून तंबूत परतला. मोहसीन खानने त्याला टिपले. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूंत 39 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याला कृणाल पंड्याने तंबूत पाठवले.

पाठोपाठ सात धावा करून सुर्यकुमार यादव हाही बाद झाला. त्यानंतर कायरान पोलार्ड आणि तिलक वर्मा यांनी सामन्यात रंग भरले. मात्र वर्माला 38 धावांवर जेसन होल्डरने तंबूत पाठवले. पोलार्डने 19 धावा करून तंबूत परतला. मग डॅनियल सॅम्सही बाद झाला. आता लखनौचा विजय ही केवळ औपचारिकता उरली होती. झालेही तसेच आणि मुंबईच्या गोटात निराशेचे ढग जमा झाले. लखनौकडून कृणाल पंड्याने 3, मोहसीन खान, रवी बिश्‍नोई व आयुष बदोनी यांनी प्रत्येकी 1 मोहरा टिपला. (LSGvsMI)

त्यापूर्वी, कर्णधार लोकेश राहुल याने ठोकलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने निर्धारित 20 षटकांत धावा फटकावल्या. राहुल नाबाद राहिला. त्याने 62 चेंडूंचा सामना करताना 103 धावा लगावल्या. या खेळीत राहुलने डझनभर चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांचा पाऊस पाडला. सलामीवीर क्विंटन डी कॉक लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार लोकेश राहुल आणि मनीष पांडे यांनी आघाडी सांभाळली. डी कॉकला जसप्रीत बुमराहच्या मार्‍यावर कर्णधार रोहित शर्माने छान टिपले.

डी कॉकने 10 धावा केल्या. राहुलने हळूहळू धावसंख्या फुगवत नेली. दरम्यानच्या काळात लखनौला तीन धक्के सहन करावे लागले. मनीष पांडेने 22 धावा फटकावल्या तर मार्कुस स्टॉयनिसला भोपळाही फोडता आला नाही. तसेच कृणाल पंड्या हाही केवळ 1 धावा करून तंबूचा रस्ता धरता झाला. कायरान पोलार्डने पांडे आणि पंड्या यांना टिपले. तसेच डॅनियर सॅम्सने स्टॉयनिसला बाद केले.

पंधरा षटकांच खेळ संपला तेव्हा लखनौने चार गड्यांच्या मोबदल्यात 116 धावा केल्या होत्या. लखनौला रोखण्यासाठी रोहित शर्माने एकूण सहा गोलंदाज वापरले. दीपक हुड्डा याला 10 धावांवर तंबूत परतावे लागले. राहुलने तुफानी शतक ठोकून आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. आयुष बदोनीने झटपट 14 धावा चोपल्या. मुंबईकडून रिले मेरेडिथ व कायरान पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन तर, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

राहुलचा शतकी धमाका (LSGvsMI)

लखनौचा कर्णधार लोकेश राहुल याची धावांची भूक उत्तरोत्तर वाढत चालली आहे. रविवारी त्याने यंदाच्या आयपीएलमधील दुसरे शतक ठोकले. या आधी त्याने मुंबईविरुद्धच शतक झळकावले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण चार शतके ठोकली असून त्यातील तीन शतके मुंबईविरुद्ध फटकावली आहेत. 2020 च्या आयपीएलमध्ये राहुलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 132 धावांची धमाकेदार खेळी केली होती. सध्या केवळ जोस बटलर राहुलच्या पुढे असून बटलरने आतापर्यंत लागोपाठ 3 शतके लगावली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news