DC vs RR : राजस्थानचा संघर्षपूर्ण विजय; मने जिंकली जिगरबाज दिल्लीने | पुढारी

DC vs RR : राजस्थानचा संघर्षपूर्ण विजय; मने जिंकली जिगरबाज दिल्लीने

मुंबई; वृत्तसंस्था : राजस्थानने दिल्ली संघाला संघर्षपूर्ण लढतीत 15 धावांनी पराभूत केले. विजयासाठी ठेवलेले 223 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीने जबरदस्त प्रयत्न केले; मात्र ते अपुरे ठरले. त्यांना 20 षटकांत 8 बाद 207 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रसिद्ध कृष्णा याने या लढतीतील एकोणीसावे षटक निर्धाव टाकून सर्वांनाच थक्क केले. तिथेच या सामन्याला कलाटणी मिळाली.

पंजाबला आधीच्या सामन्यात चिरडून टाकलेल्या दिल्लीने जिगरबाज फलंदाजी केली यात शंकाच नाही. सामना राजस्थानने खिशात टाकला, पण मने जिंकली दिल्लीने असेच या लढतीचे वर्णन करावे लागेल. दिल्लीकडून सलामीवर पृथ्वी शॉने 37, डेव्हिड वॉर्नरने 28, कर्णधार ऋषभ पंतने 44, ललित यादवने 37 तर रॉवमन पॉवेलने 36 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकातील एक चेंडू फलंदाजाच्या कंबरेच्या वर उसळला तेव्हा तो नोबॉल दिला गेला नाही. त्यावरून दिल्ली संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूणच यंदाच्या आयपीएलमधील पंचगिरीचा दर्जा सुमार असल्याचे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे.

त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने महत्त्वपूर्ण ठरणारा नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 222 धावांचा डोंगर उभारला. राजस्थानने केवळ दोन गडी गमावले. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी झकास सुरुवात केली. 10 षटकांत या जोडीने 87 धावा फलकावर लावल्या.

बटलरने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकार लगावून अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ त्याने शतकालाही गवसणी घातली. दिल्लीच्या गोलंदाजीवर पडिक्कल हाही तुटून पडला. त्याने 54 धावा कुटल्या त्या 35 चेंडूंत. 7 चौकार आणि दोन षटकार फटकावून त्याने रसिकांचे मनोरंजन केले. अखेर खलील अहमदने त्याला पायचीत पकडले व दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. बटलर व पडिक्कल यांनी 155 धावांची खणखणीत सलामी दिली. बटलरने चौकार आणि षटकारांचा पाऊसच पाडला. 116 धावा कुटल्यानंतर मुस्तफिझुर रेहमानच्या गोलंदाजीवर तो डेव्हिड वॉर्नरकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने दिल्लीच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. कर्णधार संजू सॅमसन यानेही धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा फटकावल्या. त्यासाठी त्याने फक्त 19 चेंडू घेतले. त्याचा स्ट्राईक रेट होता 242.11. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर आणि मुस्तफिझुर रेहमान यांनी प्रत्येकी 1 गडी टिपला. खरे तर दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांची जबरदस्त पिटाई झाली.

जोस बटलर सैराट

इंग्लंडचा अव्वल खेळाडू असलेल्या जोस बटलरने यंदाचा आयपीएल हंगाम गाजवला आहे. त्याने आतापर्यंत सात सामने खेळून तीन शतके झळकावली आहेत. बटलरने पहिले शतक मुंबईविरुद्ध (100) आणि दुसरे शतक (103) कोलकाताविरुद्ध ठोकले होते. आता केवळ विराट कोहली त्याच्या पुढे आहे. कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये चार शतके ठोकली होती. ख्रिस गेल, हाशिम आमला, शिखर धवन, शेन वॉटसन या अन्य फलंदाजांनी आयपीएलमध्ये दोन शतके लगावली आहेत.

संक्षिप्त धावफलक

  • राजस्थान रॉयल्स ः 20 षटकांत 5 बाद 222.
  • दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकांत 8 बाद 207.

Back to top button